॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥
॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें
म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण
। अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
॥ तिन ॥
त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण ।
हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।
जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
॥ चार ॥
भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति ।
बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा
राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
॥ पाच ॥
योगयागविधि येणें नोहे सिद्धी ।
वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
॥ सहा ॥
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ।
ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि
दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
॥ सात ॥
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप
होणें अभक्तासी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त
। हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा
दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
॥ आठ ॥
संतांचे संगतीं मनोमार्ग गति ।
आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें
बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र
दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
॥ नऊ ॥
विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान
। रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया
कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
॥ दहा ॥
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक ।
नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
॥ अकरा ॥
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील
लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें
नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे
भूतबाधा भेणे याचे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न
करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
॥ बारा ॥
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि ।
वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न
परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥
॥ तेरा ॥
समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल
जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि ।
जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान ।
हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
॥ चौदा ॥
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।
कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे
उत्तम निजस्थान ॥४॥
॥ पंधरा ॥
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत
कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरि ।
शमदमांवरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटीं राम देहांदेहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥
॥ सोळा ॥
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी
सुलभ रामकृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें
दशदिशा आत्माराम ॥४॥
॥ सतरा ॥
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥
॥ अठरा ॥
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण
सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।
सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथे मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥
॥ एकोणीस ॥
वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक
नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि
श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र
। यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
॥ विस ॥
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे
अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
॥ एकविस ॥
काळ वेळ नाम उच्चारितां नाही ।
दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा
त्या देवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥
॥ बाविस ॥
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति
मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा
पाहुणा प्राणि होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥
॥ तेविस ॥
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक
तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि
मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
॥ चौविस ॥
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां
त्वरीत भावयुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥
॥ पंचविस ॥
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं
पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें
कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें
जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र
वैकुंठ केलें असे ॥४॥
॥ सव्वीस ॥
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी
करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद
। वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी
श्रीहरि जपे सदां ॥४॥
॥ सत्तावीस ॥
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी
। रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं
ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
॥ अठठावीस ॥
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले
विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय
अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं
। उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥
अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि
त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी
मंदमति केवीं तरे ॥५॥
श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ ।
तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
॥ एकोणतीस ॥
केणाचे हे घर देह हा कोणाचा । आत्माराम त्याचा
तोचि जाणे ॥१॥
मी तूं हा विचार विवेकें शोधावा । गविंदा माधवा
याच देहीं ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा । सहस्रदळीं
उगवला सूर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नांवे रुपें
ती तुम्ही जाणा ॥४॥
==============
No comments:
Post a Comment