Wednesday, September 20, 2023

प्रज्ञासूर्य मावळतांना

 प्रज्ञासूर्य मावळतांना ...….

    20 सप्टेंबर 1915 .भाद्रपदातील दशमीचा दिवस . अख्खे पुणे शहर टिळकांच्या सार्वजनिक गणपती उत्सवात आकंठ बुडाले होते .त्याचवेळी लकडी पुला जवळच्या स्मशानभूमीत दहा -वीस शोकाकुलांच्या उपस्थितीत एक चिता जळत होती . अग्निसाक्षीने हे कलेवर सामान्य नव्हते ! भारतीय संस्कृतीची एकट्याने शिलेदारी करणाऱ्या धर्मयोध्याने आज या जगाचा निरोप घेतला होता .वऱ्हाडच्या कृषीवल कुणब्याच्या काळ्या मातीतले हे गुलाबफुल कायमचे कोमेजले होते ते संत गुलाबराव महाराज ! प्रतिकूल परिस्थितीने व्यापलेल्या  चवतीस वर्षांच्या आयुष्यपटाचा हा शोकांत होता . जन्मतः आलेले आंधळेपण /कौटुंबिक किटकीट /पत्नी विरह / सततची भ्रमंती आणखी काय काय ?अखेरच्या क्षणीही आप्त गणगोत नाही ! आहे तो केवळ दहा वर्षाचा पुत्र अनंता . अनंतानेच अग्नी डाग दिला ! आज आणि उद्याच्याही येणाऱ्या धर्मांध काळोखात ,आपले धर्मसमन्वयाचे  अतूट सूत्र महाराष्ट्राच्या हवाली करून हे लौकिक शरीर अनंतात विलीन झाले ! 

        टिळकांच्या केसरीतून , पांगरकरांच्या मुमुक्षुतून  श्रीच्या अंत्यस्टीची ठळक बातमीही नव्हती .मुमुक्षुने कोपऱ्यात दोन ओळीची जागा दिली. एवढंच ! ज्या नियतकालिकातुन ज्यांनी गेली अनेक वर्षे  धर्मचर्चा केली त्यांच्यासाठी एवढे कंजूष का व्हावे ? जवळच असलेल्या आळंदीवल्लभाची ही अधिकारीक कन्या निजधामास गेल्याची साधी कुणकुणही आळंदीकरांच्या

लेखी नव्हती ! ज्या महामानवाने धर्मशास्त्रातील गूढार्थ शोधून काढले होते ! त्यांचे हे महाप्रयाणही तसे गूढच होते . हो गूढच ! श्रींच्या शिष्यपंचायतानाला हे लौकिक प्रस्थान मान्यच नाही .ती श्रद्धा इतकी बळकट आहे की श्रींचा मृत्यू होणे .हे त्यांच्यासाठी सप्त इंगळीच्या वेदना होत्या .

  "वाचकं लेखकं वंदे" या अस्टाक्षरी मंत्रघोषात श्रींनी आपल्या शिष्य पंचायतानाच्या डोक्यावर शिरपेच चढवून , सव्वाशेच्या वर ग्रंथरचनेचे जतन / चिंतन/ मनन आणि प्रसार /प्रचाराचा भारही दिला .त्यामुळे आयुष्यभर ग्रंथसेवेचा सहवास हेच या बळकट श्रद्धेचे कारण होते .या पंचायनातील एक तरुण शिष्योत्तम श्री बाबाजी महाराज पंडीत यांनी श्रींच्या अस्थी प्रयागला नेल्या .गंगा - यमुना - सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात हे विसर्जन झाले . पंडित बिऱ्हाडी मुक्कामाला आले . अस्वस्थ झाले होते .प्रज्ञासूर्याच्या सहप्रवासातला हा त्यांचा शेवटचा मुक्काम होता.त्याच रात्री गाढ स्वप्न

निद्रेत एक भस्माची पुडी श्रींनी पंडितजींच्या हातात दिली .

"हे भस्म थोडे थोडे सेवन कर .त्याने तुला माझे ग्रंथ समजतील ! "

   पंडितजी खडबडून जागे झाले .अवतीभवती कुणी नव्हते.बिछाना आवरसावर केला .उशीखाली भस्माची पुडी होती .आयुष्यभर ,गंडे दोरे भस्म अशा चमत्कारी लीलांपासून फार दूर उभे राहणारे श्री महाराज या पट्ट शिष्यासासाठी मात्र आज उदार झाले होते .कृतज्ञतेने त्यांनी" भस्म प्रसाद" दिला .

श्री महाराजांच्या ग्रंथ संपदेचे ते उत्तरवाहक झाले.आज महाराजांची वाङ्मयीन मूर्ती आपल्या समोर ऊभी आहे , ती बाबाजी महाराज पंडितांमुळेच !

अमरावतीच्या दहीसाथेत ज्ञानेश्वर मंदिरात श्रींचा शब्दन शब्द जतन केला आहे . शिष्य पंचायताने लिहलेले पानं पान सुरक्षित आहे .या वाङ्मयीन मूर्तीचे  गुलाब दर्शन ज्यांना झाले .ते भाग्यशाली आहेत ! मधुराद्वैत संप्रदाय परिवाराने ग्रंथ आराधना करून तो हक्क मिळवला आहे .

              सामान्य साधकांना या ज्ञानगंगेत अवगाहन करणे .फारसे जमले नाही .श्रींचे साहित्य फार कठीण आहे .दुर्बोध आहे .हाच आपला समज असतो . ते समजण्यासाठी कुणी भस्माची पुडी आपल्याला आणून देणार नाही .तो अधिकारही आपला नाही .हे साहित्य सुबोध करण्यासाठी महाभारतातल्या एका कथेकडे वळावे लागते . गुरू शिष्याचे नाते ! गुरू द्रोण आणि एकलव्याचे नाते ! एकलव्याच्या आराधानेसारखे ते आपल्याला करावे लागेल .आपले महाराज अंगठा मागणार नाहीत .याची खात्री आहेच !

         पुण्यतिथी निमित्ताने जयहरी !!

                                             © पंकज आवारे

                प्रज्ञाचक्षु ज्ञान विज्ञान अभ्यास केंद्र माधान