जन्मदिवस विशेष - २०२५
नित्यतीर्थ - आळंदी महिमा
- संत श्री गुलाबराव महाराज जन्मदिन विशेष
आजकाल
जी अंधश्रद्धा व ढोंगीपणा भक्तीच्या नावाखाली सर्वत्र रचला जातोय, तो बघून आपल्याला
लाभलेल्या श्रेष्ठ संत परंपरेचे विचार व जीवन चरित्र आणखीन प्रकर्षाने सर्वांपर्यंत
पोहोचणे ही आज काळाची गरज वाटते. ही श्रेष्ठ विचारसरणी,
गुरु शिष्य परंपरा व निस्सिम भक्ती फार योग्य रीतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहोचवण्याचा श्रेय वारकरी पंथाला व वारीला जात.
सर्व समव्यापक, भेदभाव रहित, केवळ शुद्ध भक्ती भावाने ओथंबून वाहणारा अद्वितीय सोहळा म्हणजे, 'वारी' व सर्वांना जवळचा व हवाहवासा वाटणारा असा
'वारकरी पंथ'. आदिनाथा पासून सुरु झालेला नाथ संप्रदाय,
जो निवृत्तीनाथांना लाभला व पुढे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे गुरु झाले.
याच ज्ञानेश्वरांनी पुढे वारकरी संप्रदायाची स्थापना केली, जो एक वैष्णव संप्रदाय आहे. इथेच शैव व वैष्णवांचा समन्वय
माऊलींनी केला आहे. माऊलींचे गुरु हे नाथ संप्रदायाचे होते,
त्यांच्याच गुरुकृपेने पुढे माऊलींनी वैष्णव संप्रदायाचा विस्तार केला,
यातून शिव व विष्णू भक्ती ही एकमेकांशिवाय निराळी नसून एकमेकांना पूरक
आहे हे सिद्ध होते. मना सर्वथा व्देषिती जे शिवाते, परंतु बरे पूजिती माधवाते, तया ते मिळेना कदा विष्णू
भक्ती| म्हणूनि भजाव्या सदा दोन्ही व्यक्ती|| (चित्तोपदेश - संत श्री गुलाबराव महाराज)
आपणा सारिखे करिती तात्काळ| गुरुप्रमाणेच शिष्य
देखील गुरूचे कार्य पुढे चालवतात, मुख्यतः त्यासाठीच शिष्य आपला
जन्म सिद्ध करतात. माऊलींप्रमाणेच समन्वय साधण्याचा प्रयत्न ज्यांनी
केला ते म्हणजे समन्वय महर्षी ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज. शिव व विष्णू भक्तीचा समन्वय तर त्यांच्या जन्मापासूनच पाहायला मिळतो.
शिवभक्तीचे
फळ -महाराजांचे अवतरण
महाराजांचे
आजोबा राणोजीराव मोहोड,
हे निस्सिम शिवभक्त होते. माधान च्या स्वयंभू शिवमंदिरात
ते नित्य आराधना करत. शिवरात्रीचे 11 दिवस
तर फक्त राणशेणीचे भस्म खाऊन उपवास करत. त्यांच्या शिवभक्तीला
प्रसन्न होऊन त्यांना दृष्टांत झाला होता की, तुझ्या कुळात एक
तेजस्वी महापुरुष जन्म घेणार, व पुढे श्री महाराजांचा जन्म झाला.
महाराज देखील फार निस्सिम शिवभक्त होते, शिवरात्रीचे
उपवास, तासंतास ध्यान इतकेच नव्हे तर अतिशय जहाल सोमल विष देखील
महाराजांनी या शिव मंदिराच्या परिसरात प्राशन केले होते, तरीदेखील
त्यांना काही झाले नाही व यावरून नंतर हे कोणी साधारण पुरुष नव्हे हे आजूबाजूच्या मंडळींना
जाणवले. या स्वयंभू पुरातन व महाराजांच्या अवतार कार्याची साक्ष
असणाऱ्या, विश्वेश्वर शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम माधान
येथे सध्या सुरू आहे. शिवभक्ती बरोबरच कृष्ण भक्तीची ओढ लहानपणापासूनच
श्री महाराजांना होती. त्यांचे जन्मस्थान लोणी टाकळी येथे त्यांच्या
आजोळी साक्षात बाळकृष्ण त्यांच्यासोबत जेवायला येतात असे ते त्यांच्या आजीला सांगायचे.
पुढे मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना श्री महाराजांनी केली. या संप्रदायाचे मूळ सूत्रच कृष्ण व शिवभक्तीचा समन्वय साधणारे आहे.
उमा माता शिव पिता.. पती कृष्णो राधिकाद्या भगिन्यो
गोपिका मम|
शिव
आणि विष्णू हे दोघेही समसमान व एकमेकांना आराध्य आहेत. या श्रेष्ठ गुरुपरंपरेचे
उदाहरण आजही आपल्याला आळंदीत पाहायला मिळते. आराध्य असलेल्या
सिद्धेश्वर महादेवाची आज्ञा घेतल्याशिवाय माऊलींची पालखी पंढरपूरला निघत नाही व कौल/आज्ञा म्हणून महादेव मंदिराचा कळस साक्षात हलतो, तो सुख
सोहळा प्रत्यक्ष अनुभवणारे, तो भक्तीमय परिसंवाद जाणतातच.
इतके बळ खऱ्या भक्तीत असते व श्रेष्ठ गुरु शिष्य परंपरा अशीच परस्पर
आदर करणारी असते, हे आपल्याला वारकरी पंथ शिकवतो.
या वारकरी पंथाचे प्रणेते ज्ञानोबाराय यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी
विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले, इतकेच नव्हे तर आपल्या प्रिय
भक्तांसाठी संजीवनी बनवून आजही ते समाधीस्थ ध्यान लावून भक्तांच्या हाकेला ओ देतात.
आलम् दियते इती आळंदी. आलम म्हणजे समाधान,
समाधान देते ती आळंदी,असे आळंदीचे वर्णन आहे.
साक्षात शंकरांनी या भूमीवर लोळण घेऊन पुढे विष्णूचा अवतार येथे जन्म
घेणार असे पार्वतीला सांगितले होते. इंद्राला शाप मिळाल्यावर
येथेच शंकराची तपश्चर्या करून त्याचे तप सिद्धीस गेले त्यामुळे येथील महादेवाला सिद्धेश्वर
महादेव असे नाव आहे. शाप मुक्त झाल्यावर येथील नदीत इंद्राने
आंघोळ केली, त्यामुळे तिला इंद्रायणी असे नाव पडले. असे एक ना अनेक ऐतिहासिक महत्त्व आळंदीला आहे.
संत श्री गुलाबराव महाराजांनी देखील, सद्गुरु प्रेमाच्या
भरात आपली इष्टनिष्ठा व्यक्त करीत करीत, प्रत्यक्ष भगवदवतार श्री
ज्ञानेश्वर महाराजांच्या शरीराची अनध्यस्त विवर्तता व तत्सानिध्याने आळंदीची नित्य
तीर्थता, श्रुती, युक्ती व अनुभवाने ५७
ओव्यांत, नित्य तीर्थ आळंदी महिमा यामध्ये सिद्ध करून दाखविली
आहे.
महाराज
म्हणतात, वेदांनी ज्यांची कीर्ती गायली आहे व जे कैवल्याचे दान करतात अशा करुणेची मूर्ती
असलेल्या, आळंदी पती सद्गुरु नाथा आपला जयजयकार असो. ज्याचे भगवंताचे ठिकाणी जसे निस्सिम प्रेम असते, तसेच
गुरूंचे ठिकाणी आहे त्याला वेदांनी सांगितलेले सर्व अर्थ बरोबर कळतात असे श्रुतींनीही
म्हटले आहे. सर्व तीर्थांचे ठिकाणी पवित्र करण्याचे असलेले
सामर्थ्य श्री गुरूंच्या चरणांचे अंशभूत सामर्थ्य होय, असे गुरुगीतेत
प्रमाण वचन आहे. सातही समुद्राचे स्नान केल्याने जे पुण्य फळ
प्राप्त होते, ते सर्व पुण्य श्री गुरूंच्या चरणामृतातील एक बिंदू
प्राशन केल्याने मिळणाऱ्या पुण्याच्या एक सहस्त्रंश देखील नाही, असेच वेदाशास्त्रादिक सर्वांचे म्हणणे आहे. महाराज म्हणतात
माझी श्रद्धेची स्थिती या सर्वांहून विशेष आहे. ज्यांनी आपल्या
नामाचा मंत्र देऊन मला कृतार्थ केले ते सर्व कल्याणाचे कोठार, केवळ कारुण्याची मूर्ती असलेले आळंदीचे स्वामी, श्री
ज्ञानेश्वर महाराज माझे सद्गुरू आहेत. कैवल्य रूप सुवर्णाचे दान
करताना जो 'हा मोठा आहे की लहान आहे'ही
कसोटी लावून पाहत नाही. "श्रीमंत असो की गरीब असो"त्याला भगवतप्राप्तीची तळमळ असली
की पुरे, त्याचा ते उद्धार करतात. या त्यांच्या
अमृतानुभवातील वचनाला सत्य दाखवण्याकरताच त्यांनी माझी पात्रता न बघता, मला मांडीवर घेऊन आपल्या स्वनामाच्या खुणा सांगितल्या.
जो
आळंदीत समाधिवासी
| जागृत भक्तहृदयदेशी| त्रिभुवनी वाराणसी|
ती आळंदी मी म्हणे||
असा
माझा जो सद्गुरु नाथ तोच भक्त हृदयात जागृत असून आळंदीत समाधी लावून बसलेला आहे, म्हणून आळंदी ही
त्रैलोक्यात दुसरी वाराणसीच आहे,असे महाराज म्हणतात. विहीर तळे नदी ओढा यापैकी कुठलेही पाणी असो पण ते माझ्या गुरूंच्या चरणास लागले
म्हणून अत्यंत पवित्र आहे, असे समजून जो पितो, त्याच्या चरणावर गंगा लोळते. अशी त्यांची गुरुपासने विषयी
बुद्धी ते प्रकट करतात. याव्यतिरिक्त देखील वेद, युक्ती व अनुभव या तिन्ही दृष्टीने आळंदीला नित्य तीर्थपणा कसा, हे स्पष्ट करतात.
श्रुतीने
आळंदीची नित्यता सिद्धि
ब्रह्मदेवाच्या
आनंदाहून, ब्रह्मनिष्ठाचा आनंद अनंत पट अधिक असतो, असे तैत्तिरीय
उपनिषदातील श्रुतीने सांगितले असल्यामुळे ब्रह्मनिष्ठाचे ठिकाणी संपूर्ण पुण्य असते,
त्यांच्या चरण धुळीने संपूर्ण पृथ्वी पावन होते, पण जे अवतारी शरीर असते ते ब्रम्हनिष्ठाच्या शरीरापेक्षा ही आणखी विशेष पवित्र
असते कारण अवतार शरीरातील अंत:करण शिष्याच्या हृदयात आरपार शिरू
शकते. असेच अवतार शरीर ज्ञानेश्वर महाराजांचे असून, अजून पर्यंत आळंदीत आहे आणि सांख्याच्या सत्कार्यवादानुसार पाहता त्यांच्या
अवतार शरीराविषयी उपपत्ती मिळू शकते.
वेदांत
प्रमाणे नित्यता
-विवर्त हा अध्यस्तविवर्त व अनध्यस्तविवर्त असा दोन प्रकारचा आहे.
अनध्यस्तविवर्त- हे अवतार सकळं
|जया समुद्रीचे का कल्लोळ| भगवतांच्या अवतारांना
समुद्राच्या कल्लोळाची उपमा देऊन माऊलींनीअनध्यस्त विवर्त सांगितला आहे, पुढे महाराज त्याची व्याख्या करतात, जे अवतार शरीर अधिष्ठान
सच्चिदानंद परब्रम्हचा विवर्त आहे, ब्रह्माशी यत्किंचितही भिन्न
न राहता, अधिष्ठानाचा लोप न करता अधिष्ठानाचे स्पष्ट ज्ञान होऊ
देते आणि जे परम प्रेमाचा विषय असल्यामुळे त्याचे अधिष्ठान ज्ञानाने निवृत्तीही होत
नाही, त्या अवतार शरीराला अनध्यस्त विवर्त म्हणतात.
अध्यस्तविवर्त- जीवांची शरीरे
अज्ञान व कर्मजन्य असल्यामुळे ती अधिष्ठाण रूप परब्रम्हाची विवर्त असली तरी अधिष्ठानाचा
लोप करून अधिष्ठानाचे ज्ञान होऊ न देणारी, परमप्रेमाचा विषय होऊ
न शकल्यामुळे ज्ञानाने निवृत्त होणारी असतात. म्हणून त्यांना
अध्यस्तविवर्त म्हटले जाते आणि विश्व म्हणजे सर्व जीवांचे शरीर, अध्यस्तविवर्त आहेत, हेच माऊलीने विश्व हे मृगजळ|
जया रश्मीस्तव दिसे| या दोन चरणांनी सांगितले आहेत.
सांख्य
वेदांत समन्वयपूर्वक युक्तीने नित्यता सिद्धी
सत्कार्यवादी
सांख्य हे, कार्य त्रिकालबाध्य सत्य मानतात. तर वेदांती व्यवहारापुरती
कार्याला सत्यता देतात. कार्याचे आपल्या कारणात कारण रूपाने स्थायी
अस्तित्व असते, असे वेदांताच्या दृष्टीसृष्टी वादातही मानलेले
आहे, असे मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धी नामक ग्रंथात विस्ताराने
म्हटले आहे. पण या जगातील सर्व कार्यरूप पदार्थांचे उपादन कारण
एक अविद्या आहे. अविद्येची आत्मज्ञानाने निवृत्ती झाल्याबरोबर
हे सर्व जगद्रूप कार्य मिथ्या ठरते. परंतु अवतार शरीरे अज्ञानाला
अप्रतिबंधक असे अनध्यस्तविवर्त रूप असल्यामुळे ते ज्ञानाने नाहीसे किंवा निवृत्त होत
नाही. सुवर्णालंकारांमध्ये सोन्याचे ज्ञान झाले तरी अलंकार नष्ट
होत नाही, तसे ब्रह्मज्ञान झाले तरी भगवंताचे सगुण रूप कायमच
राहते. अलंकार ज्याप्रमाणे सोन्याचा विवर्त आहे, तसे अवतार शरीर हे परब्रम्हाचा विवर्त आहे, म्हणून परब्रम्हाहून
भिन्न नाही.
विषय
हे प्रारब्धानुसार प्राप्त होतात व प्रारब्ध संपले की नाश पावतात. तसे प्रेम हे प्रारब्धाने प्राप्त झालेले नसते म्हणून निस्सिम प्रेमाने प्राप्त
होणारे परमात्म्याचे शरीर प्रारब्ध संपले असता नाश पावत नाही.
अविनाशीत्वाची
योगानुसार उपपत्ती
महाराज
म्हणतात भक्ती प्रेमा करता घेतलेल्या अवतार शरीराच्या ठिकाणी कोणत्याही गुणांचा आरोप
होऊ शकत नाही,भक्ती स्थापनेकरताच माझे तात, श्री ज्ञानेश्वर महाराज
यांचा अवतारविग्रह असून व आणखी त्यांनी समाधी लावलेली आहे म्हणून त्यांच्या देहाच्या
अविनाशी पणाची योगशास्त्र प्रमाणे उपपत्ती देता येते. सात्विक
अशा निवृद्ध भूमिकेवर चित्त असून, ते दृढ झाले असता योग्याचे
शरीरही सत्वमय होते आणि केवळ संस्कार मात्र चित्त राहते अशा 'असंप्रज्ञात'समाधीत योगी असताना, त्याचा देह पूर्ण रजस्तमरहित असा शुद्ध सत्वात्मक होतो. अशा योग्यांचे हृदय इतके शुद्ध सात्विक होते की सूर्यकांत मन्यातून सूर्याची
किरणे जशी दुसरीकडे परावृत्त होऊन, सूर्याप्रमाणे दैदिप्यमान
अशी केंद्रीभूत होतात, त्याप्रमाणे त्यांच्या हृदयातून अधिष्ठानभूत
चैतन्य सूर्याची किरणे स्पष्ट बाहेर पडून शिष्याच्या हृदयात प्रवेश करतात व इतर जणांना
कृतार्थ करतात. त्यांना रजतम गुणरूपी मळाचा पुन्हा स्पर्श होत
नाही इतकेच नव्हे तर सर्वसंहार करणारा प्रलय कालीचा प्रचंड तमोगुण देखील त्या देहाला
आपल्यात लीन करून घेऊ शकत नाही, असे योगवसिष्ठात सांगितले आहे.
काकभुशुंडी मुनी हे ज्या वृक्षावर बसले होते त्या वृक्षासह प्रलयामध्ये
देखील, आपले शरीर मोक्षाप्रमाणे अविनाशी करून राहिले होते.
अशी निरुद्ध भूमिकेवर राहणाऱ्या श्रेष्ठ ध्यान्याच्या शरीराची स्थिती सांगितली आहे. (उदाहरण योगवसिष्ठ
- कर्कटी, भृगुसूत शुक्र) याप्रमाणे योग्याचे शरीर जर प्रलय कालात नाश होत नाही, तर मग अविद्यारहित असे अनध्यस्तविवर्त परब्रम्ह शरीर व ती भूमी हे कधीच नाश
पावणार नाहीत हे सिद्धच आहे. प्रियलीला महोत्सव या ग्रंथात श्रीमहाराज
म्हणतात, प्राण सात्विक झाला असता तो स्थिर होतो व हृदय ही सात्विक
होते, म्हणूनच हृदयातून चेतनाचा प्रकाश बाहेर पडतो. मग त्या हृदयातून बाहेर पडणाऱ्या ज्ञान प्रकाशाच्या योगाने त्या ज्ञानी पुरुषाची
भक्ती करणारे भक्त पूर्ण होऊ लागतात म्हणूनच निर्विकल्प समाधी साधून विदेह मुक्त झालेल्या
सत्पुरुषांचे ठिकाणी शिघ्र अति शिघ्र लगेच समाधी केली पाहिजे. आळंदी वल्लभ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीत आहेत आणि ते स्वतः खरोखर नित्यमुक्तच
आहेत तरी नित्यमुक्त रूपी ज्ञानसूर्याची प्रभा त्यांच्या शुद्ध सात्विक अशा हृदय रूप
सूर्यकांत मण्याशी संबंधित होऊन मुमुक्षजणांना उपदेश करीत असते. पुढे महाराज म्हणतात, संपूर्ण नदी चे पाणी समुद्रात मिळाल्यानंतर
तेच पाणी घेऊन मेघ तयार होऊ लागले, तर पाणी त्याला नाही म्हणत
नाही, त्याप्रमाणे विदेहमुक्त होऊन हृदय रूप सूर्यकांन्तात त्यांचे
ज्ञान प्रगट झाले आणि इतरांना मुक्ती देईल असे उपकारक झाले तर आम्ही नाही म्हणत नाही.
म्हणून निर्विकल्प समाधीस्थ असलेली ज्ञानेश्वर माऊली अनादि व अनंत कालापर्यंत
सर्वांना गुरुरूप आहे. नित्य अशा ज्या शरीराची मूर्ती भावना केल्यास
भक्ताची उपासना सिद्ध होते, ते शरीर आळंदी येथे प्रत्यक्ष आहे
म्हणून तेथे नित्य तीर्थता आहे. अशाप्रकारे स्वानुभावाने श्री
महाराजांनी आळंदीची नित्य तीर्थता सिद्ध केली आहे.
यालागी अनंत अनंत |आळंदी हे मुख्य तीर्थ |
श्री
ज्ञानेश्वर महाराज हेच माझे माता व पिता आहेत मी त्यांच्या कृपेने मुक्त होऊनही, अनंत काल त्यांचे
चरणांचे ठिकाणी राहून नित्य तीर्थ अशा आळंदीची कीर्तीच गात राहील. श्रुती,युक्ती, अनुभव या तिन्ही
प्रमाणांनी पाहता श्री ज्ञानेश्वर महाराज परम समाधी लावून आळंदीला बसलेले आहेत,
म्हणून आळंदी नित्य तीर्थ आहे असे केलेले हे वर्णन म्हणजे आळंदी महिमा
महाराजांनी माऊली चरणी समर्पित केले.
महाराज
म्हणतात, मी कुठल्याही पंथाचा अभिमान नाही तथापि शहाणा असा वारकरी पंथ मला मान्य आहे.
इतका सुंदर पंथ मागे झाला नाही व पुढे होणार नाही, हा पंथ इतक्या शहाणपणाने स्थापिला गेला आहे की, याला
पंथ न म्हणता धर्मच नाव शोभते. निरनिराळ्या देवतांचे उपासक या
पंथात होऊन गेले आहेत. नरहरी सोनार महाशैव, जनार्दन एकनाथ दत्तभक्त, भानुदास सूर्योपासक,
तात, तुकारामादी वैष्णव, नाथादी ब्राह्मण, तुकारामादी कुणबी, शेखमोहम्मद आदी मुसलमान, रोहिदास चांभार, चोखामेळादि महार, कान्होपात्रादि वैश्या, मुक्ताबाई सारख्या ब्रह्मचारिणी आचार्या, जनाबाई सारख्या
दासी, नामदेवांची लालन भक्ती, विश्वंभराधिकांचे
वात्सल्य, मुक्तकेशी आदी बायांचे माधुर्य हे सर्व या पंथात एकवटले
आहे. हा पंथ खास विश्वधर्म होणार! धर्मभेदांचा नाश करून सद्गती देणारा हाच एक पंथ होईल. यातून या पंथाविषयी व माऊलीं विषयी महाराजांचे असणारे निस्सीम प्रेम,भक्ती व आदर दिसून येतो आणि म्हणूनच त्यांचे ३४ वर्षातील अद्वितीय कार्य त्यांनी
माऊली चरणी समर्पित केले आहे. अशा या प्रेमळ ज्ञानेश्वरकन्येला
जन्मदिनानिमित्त शतशः प्रणाम.
लेखिका
राधिका
शरदराव मोहोड
७०५८९४९३३८