संत श्री गुलाबराव महाराज जन्मदिन विशेष
युगप्रवर्तक संत श्री गुलाबराव महाराजांचा दैवयत्नवाद
आजकालच्या धकाधकीच्या आणि जलद तंत्रज्ञानाच्या युगात नैराश्य येणे हे फार वाढले आहे. पण अशावेळी स्वतःला व स्वतःच्या कर्मांना दोष न देता प्रयत्नाने आपण त्यावर विजय मिळवू शकतो, ही शिकवण आपल्याला संत साहित्यातून व जीवनातून कायम मिळते. संतांनी आपल्याला शिकवलेला प्रयत्नवाद हा आजच्या पिढीसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी मोलाचा आहे. असाच प्रयत्नवाद संपूर्ण विचारातून व जीवनातून प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवणारे, विसाव्या शतकातील युवा वैदर्भीय संत श्री गुलाबराव महाराज. महाराजांचा जन्म आषाढ शुद्ध दशमी रोजी, लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी मोहोड घराण्यात झाला. नऊ महिन्यांचे असताना त्यांचे डोळे आले व चुकीच्या उपचारामुळे ते बालांध झाले. बालांध असून सुद्धा डोळसलाही लाजवेल अशा १३० ग्रंथांची रचना त्यांनी केली. त्यांच्या या ग्रंथसंपदेत वेदांत, आयुर्वेद, विज्ञान, संगीत, योग, सांख्य, इतिहास, क्रीडा, मनोविज्ञान, काव्यशास्त्र, नाट्य, संस्कृत, पाश्चात्य तत्वज्ञानाचे खंडन मंडन, नवांग नावाची नवीन लिपी, २५०० अभंग, २५०० पदे, १२५० गीते, १००० श्लोक, २३००० ओव्या या सर्वांचा समावेश आहे. दैवाने मिळालेल्या परिस्थितीचा शोक न करता स्व प्रयत्नांच्या जोरावर संपूर्ण जगाला अमृततुल्य असे शास्त्र भांडार म्हणजे श्री महाराजांचे १३० ग्रंथ. आपल्याला बरेचदा निराश झाल्यावर असे वाटते, आयुष्यात जे काही होते ते आपल्या पूर्वकर्मा ने व त्यामुळे प्रयत्न वगैरे कितीही केले तरी त्याचा काय फायदा? अशावेळी महाराजांनी शिकवलेला प्रयत्नवाद वाखाण्याजोगा आहे. दैववाद आणि प्रयत्नवाद याबाबत संतांबद्दल बरेच गैरसमज आहेत, परंतु या मिथ्या जगतापासून सुटका करण्यासाठी प्रयत्नांचा आश्रय घ्यावा, असाच उपदेश सर्व संतांनी केला आहे, कारण हा दैववादी गोंधळ प्रभू श्री रामा ना देखील चुकला नाही, ते देखील वसिष्ठांना विचारतात, प्रयत्नांनी जगताची निवृत्ती कशी करायची, कारण जे काही येते ते दैवाने, त्यातही आता कृता युग नसल्याने मनुष्याला सत्कर्म करावेसे वाटत नाही.या युगामध्ये माझ्याकडून प्रयत्न होईल असे वाटत नाही.पुढे या दैव वादाच्या योगाने ते बरेच प्रश्न वसिष्ठांना विचारतात, १. जीव परमेश्वर जिकडे नेईल तिकडे जातो, २.दैवाच्या योगाने सुखदुःख भोगतो, ४.युगामुळे त्याला तसे करावे लागते, ईश्वर जसे करवतो तसे तो करतो व ईश्वराची इच्छा असेल तर तो स्वर्गात, नसेल तर नरकात, ५.ज्ञानीं जर प्रारब्धाने भोग भोगतो, तर आमच्यासारख्या अज्ञाण्याला ते कसे चुकतील? त्यावर मार्गदर्शन करताना वशिष्ठ म्हणतात, या जगात आत्मा सोडून दुसरा कोणताच पदार्थ नित्य नाही. ज्या पदार्थाला उत्पत्ती असते तो नाश अवश्य पावतो. असे तीन प्रकारचे उत्पत्ती पदार्थ असतात १.मिश्रणाने- उदाहरणार्थ भाजी तिखट, मीठ, तेल, मिश्रणाने बनते, मिश्रण काढलं की पदार्थ नाश पावतो. २.विकाराने- उदाहरणार्थ दही, बीजापासून वृक्ष. ३. अज्ञानाने- उदाहरणार्थ रज्जू सर्प, दोरी सर्प असल्याचा भास होतो, दोरीचे ज्ञान झाले की सर्प नाश पावतो.
नित्य हे दोन प्रकारचे असतात १.बदलणारे- उदाहरणार्थ वृक्ष, वृक्ष व बीज यांचा अनादी संबंध असतो पण, प्रयत्नांनी यांचा नाश करता येतो. बीज भाजून झाड पून्हा येत नाही. २. न बदलणारे नित्य- पृथ्वी अनादी आहे, पण तिचा नाश करता येत नाही, तसेच ब्रम्ह हे अनादी आहे. परन्तु दैव जर अनादीसिद्ध मानले तर त्याला फळं येऊ नये, कारण अनादी वस्तू या न बदलणाऱ्या असतात. परंतु दैव हे बीज व वृक्षाप्रमाने अनादी आहे, कर्माच्या योगाने देह व देहाच्या योगाने कर्म हा बदलणारा नित्यपणा दैवात आहे, त्यामुळे प्रयत्नांनी त्याचा नाश होऊ शकतो. खरे पाहता दैव हे अनादी नाहीच, कारण जे कार्य आपण निर्माण केले आहे ते मोडायला काय हरकत आहे?
ज्याप्रमाणे कोशाचा किडा घर करून स्वतःलाच त्यात बांधून घेतो व मरतो, त्याप्रमाणे मूर्ख मनुष्य विषयावर आसक्ती ठेवून दैव दूर न करता सर्व काही दैवावर सोडून देतो. युगाला दोष देणे देखील तेवढेच चुकीचे, कारण काळाला तर आळशी माणसे सुद्धा हरवू शकतात. सकाळी शौच न करता आळसाने काही जण दुपारी जातात, मग काळाला प्रयत्नांनी का हरवता येणार नाही? काळ हा अखंड आहे. सवयीला प्रतिबंधक काळ असतो, प्रयत्नांनी त्याला प्रतिबंध घालता येतो. उदाहरणार्थ मुंबईचा रस्ता सहा महिन्याचा असणार तरी रेल्वेने तो चोवीस तासांचा झाला. सवयीने काळ कसाही बदलता येतो. एका मनुष्याला जेवताना मरण आले, पण त्याची कढीत इच्छा राहून गेली, यमदूत आला असताना तो त्याला म्हणाला, तुम्ही नव्या यमाचे दूत आहात का? तो गोंधळला व यमाला विचारायला गेला, यमालाही प्रश्न पडला व तो ब्रह्म, विष्णू महेश पर्यंत जाऊन पोहोचला, शंकराने म्हंटले तुझा काळ संपला नाही, असा कसा नवीन यम करता येईल, ज्याने हे सांगितले त्याला बोलवले, तेव्हा त्याने कढी प्यायची होती, म्हणून त्याने यमदुता ला नवीन यम आला आहे असे सांगितले हे कळले. शंकराने त्या मनुष्यास नेण्यास सांगितले, परंतु तो हुशारीने म्हणाला, मी सर्वांना सांगेल की हरिहराची सेवा करू नका, कारण त्यांचे दर्शन घडून देखील मला मृत्युलोकी पाठवले, अशाप्रकारे त्याला पुरीतच ठेवण्यात आले.याप्रमाणे त्याची यम पुरी चुकली. तात्पर्य युगाला आपण जिंकू शकतो.
त्याचप्रमाणे ईश्वर जसे करवेल तस मनुष्य करतो यावर ते म्हणतात, ज्याप्रमाणे पाणी आंब्याच्या व कडुनिंबाच्या झाडांना सारखी पुष्टी देते, पण पाण्यावर गोडपणा वा कडूपणा अवलंबून नसतो, त्याप्रमाणे माणसाची कर्मे सुख दुखास कारणीभूत असून, ईश्वर पाण्याप्रमाणे वाईट असो व चांगला प्रयत्नाला तो पुष्टी देतो. ज्ञानीयांच्या विषयी बोलावे तर, आत्मा कर्ता नाही ही त्यांची दृढ बुद्धी असते त्यामुळे त्यांना प्रयत्न करायची गरज नसते.मुमुक्षाणे मात्र प्रयत्नच करावा, दैव वगैरे मानू नये. दैवाला जिंकण्यासाठी परमेश्वराचे साह्य घ्यावे.
हे प्रयत्न कसे करावे यासंबंधी सांगताना महाराज म्हणतात, एखादा किल्ला बांधताना एकाने जर खूप कारागीर लावले व दुसऱ्याला एकच कारागीर मिळाला, तर ज्याच्याकडे भरपूर कारागीर त्याचा किल्ला लवकर होईल. त्याचप्रमाणे परमार्थरुपी किल्ला बांधण्याकरता ज्यांनी योग रुपी एकच कारागीर लावला त्यांना पुष्कळ जन्म लागते, त्यामुळे हा परमार्थरुपी किल्ला बांधण्याकरता चार कारागीर महत्वाचे आहेत. १. शम - मनाला ताब्यात ठेवणे. २.विचार- आत्मा कोण व अनात्मा कोण हे ओळखणे, मनावर दया करू नये, अभ्यास व वैराग्य ने मन जिंकल्या जाते. शम मिळवण्याकरिता विचार उपयोगी पडतात. ३.संतोष- म्हणजे आपणास काही मिळो अथवा न मिळो पण दुःख झाले नाही म्हणून समाधान वाटणे. ४.सत्संग- आत्मा देहापासून वेगळा, हे ज्ञान झाल्यावर जीव ब्रम्होक्या उपदेश करून, मार्गत येणारे अडथळे कसे दूर करावे, हे समन्वयाने जाणणारा पुरुष खरा संत.अशाप्रकारे प्रयत्नांनी दैववादी विचारांवर कसा जय करावा हे सांगितले.
महाराज पत्रातून शिष्याला प्रयत्नवाद सांगताना, पाश्चात्त्य देहात्मवाद यांचे साडेतोड पद्धतीने खंडन करताना म्हणतात, चार्वाकाने आपल्याकडे देहात्मवाद उभारला आहे, “ खाऊन पिऊन घ्या, पुढे मेल्यावर कोण पाहता काय होईल ते” असे आपण देखील बरेचदा सहज म्हणतो. पाश्चात्य फिलॉसॉफी नुसार पुढे अमुक होईल हे निश्चयाने सांगता येत नाही. यावर महाराज म्हणतात, तसे होणार नाही हे देखील सांगता येत नाही. मागून चालत आलेल्या गोष्टी पुढे तशाच चालतील हे अनुमान करणे चुकीचे. कित्येक प्राण्यांना पाणी कधी येईल हे कळतं, त्यांच्या अनुभवावरून देखील स्पष्ट होते की पुढे काय होईल व काय नाही, हे म्हणण्याला सर्वज्ञता लागते. पुढे काय होईल हे सांगता येत नसेल, तर पुढे काय होणार नाही याची देखील कल्पना नसते. सर्वच संशय असेल तर ह्युमच्या म्हणण्याचा तरी अर्थ का बरोबर असावा?
आपल्याकडे दैव म्हणजे पूर्व जन्माचा आपणच केलेल्या प्रयत्न व पाश्चात फेटलिझम म्हणजे आपल्या जीविताची ईश्वराने जशी किल्ली फिरवली तसे वागणे भाग पडते असा आहे. काळाच्या आधीन करून घेणे हा फेटलिझंम आहे.
आस्तिक आणि नास्तिक दोघांमध्ये पण प्रयत्नवाद आहे. कुठलेही शुभकार्य व्यर्थ जाणार नाही असा आस्तिकांचा प्रयत्नवाद. तर नास्तिकांचा प्रयत्न वाद इतका भयंकर आहे, की त्याच्या योगाने नीती नाहीशी होते. पूर्वीच्या जन्माचे काहीच नसल्यामुळे सर्व काही याच जन्मात मिळाले पाहिजे व आम्ही ते मिळवू. पुढे मेल्यावर याचे सार्थक होईल, असे का म्हणावे? असा हा त्यांचा प्रयत्नवाद म्हणजे फ्रिझम. महाराज म्हणतात, हा उतावीळपणा आहे. शुद्ध वेड आहे. कारण जितका फळाविषयी उतावीळपणा तितकाच शिथिलपणा साधनेत येतो.
यात आणखीन एक प्रकार म्हणजे पाश्चात्य फेटलिझम, यानुसार मनुष्य ईश्वरावर पारतंत्र्य आहे. आपण अत्यंत पारतंत्र आहोत असेच आपल्याला कायम दैववादात सांगितले जाते, परंतु महाराज म्हणतात, अत्यंत पारतंत्र अशी कोणतीच वस्तू राहू शकत नाही. अर्ध स्वातंत्र्य व अर्ध पारतंत्र अशाच सर्व वस्तू आहेत. एखादा पदार्थ पारतंत्र्य असेल तर स्नेहा कर्षणामुळे कोइसिव फोर्स एका ॲटम मध्ये सामावल्या गेला पाहिजे, बरे तो स्वातंत्र असेल तर फोर्स न राहिल्यामुळे चुराडा झाला पाहिजे. तसे होत नाही, त्यामुळे सर्व अल्प पदार्थास अर्ध स्वातंत्र्य व अर्ध पारतंत्र मानल्यापासून गत्यंतर नाही. जड पदार्थाचे स्वातंत्र्य त्याच्या शक्तीत व सजीवाचे त्याच्या मनात असते. जर कोणी अत्यंत पारतंत्र्यात आहे, तर तो पारतंत्र असल्याची जाणीव देखील व्हायला नको कारण, त्याला अस्तित्व तरी कसे जाणवेल? पारतंत्र असताना एकाचे ऐकता व एकाचे नाही असे का? त्याचप्रमाणे एकात सुख व दुसऱ्यात दुःख एवढे तरी स्वातंत्र्य आहेच, अशा प्रकारे महाराज म्हणतात, मी उतावेळवादी नाही व पारतंत्र्याणे निराशावादी नाही.
अशाप्रकारे पाश्चात्य दैववाद व प्रयत्नवाद यांचे खंडन करतात.
महाराज म्हणतात, तुम्हाला स्वातंत्र्य असेल तितक्याचा फायदा करून घ्या, आळस सोडा, हाता पायाने काम करा, दैवाने तुमचे हात पाय बांधले तर वाणीने काम करा, दैवाने तोंड बांधले तर, मनाने काम करा, मन जरी वेडे केले तरी देखील तुमचे स्वातंत्र घेऊ शकत नाही कारण, वेड लागल्यावर ज्या स्थितीत जाल , ती स्थिती स्वातंत्र्य वाटते. म्हणूनच दैवीक-शारीरिक आपत्ती आल्यास, मानसिक धर्म पूर्ण होऊ शकतो असे शास्त्रात सांगितले आहे.
झाडे जरी सावली देतात तरी, छत्री धरून सावली देणाऱ्यांचे पुण्य झाडांना मिळत नाही. स्वाभाविक सत्वगुणापेक्षा प्रायत्नीक सत्वगुणाची किंमत मनुष्य जन्मात अधिक आहे. इतके महत्व प्रयत्नांना दिले आहे.
शास्त्रात सांगितलेला दैववाद हा होऊन गेलेले दुःख विसरण्यासाठीच प्रतिपादन केलेला आहे.कारण जे झाले ते पूर्व कर्माचे फलित म्हणून समजूत काढू शकतो, परंतु येणारे दुःख नाहीसे करण्यासाठी प्रयत्नच केला पाहिजे. असे व्यवहारात वागावे.परमार्थ प्राप्तीसाठी अर्थार्जन व विषय दैवावर सोडून, धर्म व मोक्ष या दोन पुरुषार्थासाठी कंबर कसून प्रयत्नाला लागावे.
प्रारब्धवाद सांडवा, अंतरी ब्रम्ह प्रयत्न मांडावा.
देहाहंकार भाव दंडावा... खंडावा क्रोधू..
कोणतेही कार्य फुकट जात नाही हाच माझा दैवयत्नवाद.
कोणी देखील रिकामे बसलेले महाराजांना बिलकुल आवडत नाही. आपल्या घरातील लोक रिकामे असेल, तर त्यांना जोडे शिवणे देखील शिकवावे पण रिकामी बसू नये. महाराज म्हणतात, “ निश्चये माझीया संप्रदायी, द्वाड एक जो रिकामा राही, ज्ञानी वा धर्मी वा सुखार्थ देही श्रमत जावे|
प्रत्येकाने आत्मज्ञानासाठी प्रयत्न करीत रहावे, ते होत नसेल तर धर्मासाठी धडपड करावी, तेही शक्य नसेल तर स्वतःच्या दैहीक सुखासाठी तरी श्रम करीत जावे, पण माझ्या संप्रदायात रिकामे कोणीही बसू नये अशा परखड शब्दात ते प्रयत्नवादाचे महत्त्व सांगतात.
अशाप्रकारे व्यावहारिकाला व परमार्थिकाला दैव व प्रयत्न दोन्ही प्रकारे आयुष्यात समन्वय साधून कसं उद्धार करायचा हे सोप्या पद्धतीने सांगितले हाच महाराजांचा श्रेष्ठ दैवयत्नवाद.
अशा या श्रेष्ठ प्रयत्नवादी समन्वय महर्षींना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त शतशः नमन
तुझा पाणी स्पर्श ज्ञानियांचा हर्ष
प्रेमाचा निष्कर्ष तूची दिला.. ( बाबाजी महाराज)
लेखिका
कु. राधिका शरदराव मोहोड ७०५८९४९३३८
संदर्भ.-
सुबोध हिंदुधर्म, साधुबोध, पत्र व्यवहार.