Wednesday, June 28, 2023

जन्मदिन विशेष

संत श्री गुलाबराव महाराज जन्मदिन विशेष 
जगन्मान्य धर्म 

        


         “परिस्थितीने बलेकरून मला अधर्मात ओढून नेले, तरी मी तोंडाने धर्म सुचवून मरेन” असा निश्चय बाळगणारे, “सर्वधर्म समान आहेत तर, आपला धर्म का सोडावा? असे युक्तीने पटवून देणारे, समन्वय महर्षी संत श्री गुलाबराव महाराज यांचा आज जन्मदिवस (आषाढ शुद्ध दशमी- १८८१) महाराजांनी 34 वर्षांच्या आयुष्यात 130 ग्रंथांची रचना केली. आज धर्माधर्मातील व्देष बघता, महाराजांचे सर्व धर्म समन्वयाचे विचार आजच्या युवा पिढीसाठी अमृततुल्य आहेत. श्री महाराज, हिंदू धर्म हा जगनमान्य धर्म होण्यास कसा पात्र आहे याविषयी सुबोध हिंदू धर्म या त्यांच्या ग्रंथात सखोल मार्गदर्शन करतात. सर्वसामान्य धर्माची कल्पना समजून सांगताना महाराज म्हणतात, आपण जगाकडे पाहिले असता दोन प्रकार दिसतात. १. प्रत्येक मनुष्य कोणत्यातरी सामाजिक बंधनाने समाजाशी बद्ध आहे. २ दुसरा प्रकार असा की तो मनुष्य त्याला अनुकूल असेल असेच बंधन लावून घेतो व वाईट बंधनाने तो समाजाशी बांधला जात नाही, म्हणजेच प्रत्येक मनुष्यात अनुकूल व प्रतिकूल निवडण्याची शक्ती असते. पहिल्या प्रकारच्या दृष्टीने तो जगताचा घटकावय आहे व दुसऱ्या दृष्टीने तो स्वातंत्र्य आहे. एका दृष्टीने तो समाजातला गणला जातो व दुसऱ्या रीतीने तो जर कुटुंबाचे हित करणारा नसला व समाजाच्या कल्याणाकरता झटणारा असला तर कुटुंबाच्या दृष्टीने वेडा गणला जातो, पण समाजाच्या दृष्टीने तो चांगला गणला जातो, याप्रमाणे मनाला ज्या रीतीने वळण द्यावे त्या दिशेने त्याची वाढ होते व अमुक मनुष्य वेडा आहे किंवा शहाणा आहे हे जगातील कोणत्याच कंडिशन ने ठरवता येत नाही मनाला चांगला वाटला तर चांगला व वाईट वाटलं तर वाईट तथापि काही जरी घेतले तरी प्रत्येकात कमी दिसतेच. परंतु प्रयत्नाने आपण काहीही करू शकतो, जेव्हा एखादा मनुष्य आपले सर्व चित्त्त् एकाच गोष्टीकडे लावतो, तेव्हा तो वैषयिक दशेला सोडून त्याच्यापेक्षा उंच दशेला जातो. जसा जसा मनुष्य आपले चित्त इतर गोष्टीकडून काढून एकाच गोष्टीवर लावतो, तसा तसा तो या नॉर्मल स्टेटला सोडून सुपर नॉर्मल स्टेट ( अलौकिक दशा) मध्ये शिरतो, याची पुष्कळ उदाहरणे आहेत, न्यूटन एकदा विचारात गढला असता बटाटे धुण्याला देण्याऐवजी त्यांनी आपली घड्याळ धुण्यास दिली, ही गोष्ट वैषयिक बाबी बद्दल झाली, याच प्रमाणे धर्माच्या बाबतीतही जर आपल्याला जगत्कारणाशी( जगताचे कारण- सर्व व्यापक परमात्मा) मिळावयाचे आहे, तर आपल्याला नॉर्मल स्टेट सोडून (लौकिक किंवा व्यावहारिक)त्याच्यापेक्षाही उंच उंच स्थितीत गेले पाहिजे. जगत्कारणापासून आलेले विचार हे नॉर्मल स्टेटच्या वर असल्यामुळे इतर लोकांच्या दृष्टीने ते जरी वेडे ठरले, तरी कोणी काही म्हटले तरी ते त्यापासून ढळत नाहीत. आपल्या स्टेटमध्ये बरोबर असून जर कोणी कितीही म्हटले तरी ढळू नये हे तत्व प्रत्येक धर्मात आहे, जगत्कारणाशी जसे जसे ऐक्य पावत जातात तसे ते उच्च ज्ञान मिळवतात. आता जगत्कारणाशी ऐक्य होण्याकरता ज्या सूक्ष्मदशेत (डीप स्टेट) जावे लागते त्याची काही मर्यादा आपल्या धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याच धर्मात दिली नाही व ज्यायोगाने या स्थितीत जाता येईल अशा पुष्कळशाा प्रक्रिया आर्य धर्मात सांगितल्या आहेत, म्हणून हे सिद्ध झाले की आपला धर्म काही नॉर्मल स्टेट मधून निघाला नसून सुपर नॉर्मल स्टेट मधून निघाला आहे कारण आपल्या धर्मातील तत्वे ही नॉर्मल स्टेट मधून निघत नसतात. या सुपर नॉर्मल स्टेट मध्ये जाण्याकरता जगत्कारणाकडेच जाण्याचा प्रयत्न करून तिकडे जशी जशी एकाग्रता होईल तसे तसे प्रयत्न करणे. मनाचा स्वभाव असा आहे की जिकडे ते एक वेळ प्रेम करू लागले, त्याकडेच ते आकर्षिले जाते. जगत्कारणाशी मन लावले तर तिकडेच ते ओढल्या जाते. इतर रूपांवर प्रेम करण्यापेक्षा जगत्कारणावर प्रेम करून त्याच्या प्रेमात गुंग होणे ईष्ट आहे, प्रिय वस्तू व आपल्यात कधीच वियोग न होणे म्हणजे प्रेमाची सीमा झाली. या सीमेत जाण्यापूर्वी या प्रेमाच्या तीन पायऱ्या आहेत १. पूज्यबुद्धी- हि पहिली पायरी चाकरपणाची आहे. याचे दोन भाग होतात एक साधारण चाकर व दुसरा एकनिष्ठ चाकर. पहिल्या प्रकारची चाकरी भीतीने उत्पन्न होते व त्यात कुचरपणा असतो. दुसऱ्या प्रकारची चाकरी पूज्य बुद्धीने उत्पन्न होते यालाच दास्यभक्ती म्हणतात.२.प्रिय वस्तुशी नाते जुळवणे- दुसरी पायरी म्हणजे आपले व प्रिय वस्तूशी नाते जुळवणे. यात आपल्या व जगत्कारणाचा काहीतरी संबंध जुळून आणावा म्हणजे जगत्कारण आपला पिता आहे व माता आहे व माझ्या पित्याशी मी जसे निर्भीड वागतो पण वाईट कामात त्यांचा धाक वागवतो त्याचप्रमाणे वागणे. ज्यांना परमेश्वराशी नाते आहे असे वाटते त्यांच्यापासून जनसमुदायालाही त्रास होत नाही. ३.ती वस्तू व आपण एक होणे- तिसऱ्या पायरीत तर काहीच राहत नाही तिसऱ्या पायरीत एक होते. या पायरीत जगत्कारणाशिवाय दुसऱ्या वस्तूशी मिळून जाता येत नाही, म्हणून आपल्या प्रेमातच ती वस्तू येईल असा नियम करावा। आता या तीन पायऱ्यांनी सर्व जगाला पोहोचवण्याविषयी कोणता धर्म समर्थ आहे, ते महाराज सांगतात. आर्य धर्मात ईश्वराची आज्ञा पाळण्याविषयी भीती व त्याच्याविषयी प्रीती हे दोन्ही संकलित केले आहेत. आपल्या स्वभावाला वळण देऊन निरनिराळ्या प्रकारचे स्वभाव एकाच मार्गाने वळवता येईल अशा प्रकारचे टीचिंग्स पाहिजे व ते आपल्या धर्मात आहे। पुष्कळांनी धर्म एक करण्याचे खटाटक केली, पण यश आले नाही, कारण त्यांचे वर्तन लोकांना सुलभ गेले नाही. जगात निराळे स्वभाव आहेत व ईश्वर जर जगाचा पिता आहे तर या सर्व लोकांचे स्वभाव एकाजुटीने आणून एका मार्गात लावणे हे त्याचे काम आहे व हे काम केवळ आपल्या धर्माने होते, ते कसे? तर महाराज म्हणतात, जगाचे निरीक्षण करून जर विचार केला तर असे दिसते की ठळक रीतीने मनुष्यांचे चार भाग होऊ शकतात व त्यांच्यामध्ये चार प्रकारच्या ठोकळ प्रवृत्ती दिसतात. कित्येकांना वाटते की काहीतरी काम करावे. या वर्गाच्या लोकांना जर एका चांगल्या मार्गाला लावायचे आहे तर त्यांना जे वाटते, की परिस्थितीच्या स्वाधीन राहून त्या परिस्थितीत होईल तेवढा फायदा करून घ्यावा व त्यातच सुखदुःख भोगत राहावे, अशांना इहलोकात व परलोकात ज्या रीतीने सुखच मिळेल असे कार्य करण्याचा नियम लावून देणे चांगले व तो नियम आर्य धर्माने चांगला लावता येईल. तो नियम म्हणजे दुसऱ्यांचे चांगले करणे,व्यवहारात चांगले वागणे, दुसऱ्याला चांगला मार्ग सांगणे, सत्य बोलणे, वगैरे या प्रकारच्या शिक्षणाला कर्मयोग म्हणतात. योग: कर्मसु कौशलम्। आपल्या कामात चांगली कुशलता मिळवणे हा कर्मयोग या आर्या धर्मातच आहे, दुसऱ्या कोणत्याच धर्मात नाही म्हणून या प्रवृत्तीच्या माणसांकरिता या आर्य धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याच धर्मात मार्ग नाही. परकीय भाषेत तर कर्म शब्दाचा अर्थ बोधक शब्दच नाही. यातला दुसरा प्रकार म्हणजे कित्येकांना आपण प्रेम करावेसे वाटते, त्यांची ती प्रेममय वृत्ती जगत्कारणाचे ठाई नेहमी असून त्यांच्या प्रेमाने अंतकरण भरू देणे,याला भक्तीयोग म्हणतात. येथपर्यंत आल्यावर कर्मयोगाची अवधी संपते. ही प्रवृत्ती फारच थोडक्या लोकांमध्ये असते. तिसऱ्या प्रकारचा प्रवृत्तींना आपल्यामध्ये ज्या काही गुप्त शक्ती आहेत ज्यांच्या योगाने, केव्हा केव्हा अलौकिक गोष्टी घडतात, त्या जाणून त्यांचा उपयोग करावा असे वाटते, हा राजयोग होय. चौथा प्रकारामध्ये कित्येकांना वाटते, मी कोण आहे?, कोठून आलो?, हे जगत कसे झाले? वगैरे. याचे उत्तर पुष्कळ तत्त्वज्ञानात दिले आहे व कित्येक ठिकाणी हिंदू लोकांचे विचार घेतलेले दिसते. परकीय तत्वज्ञान आपण कोण आहोत? या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचले आहे व इथून पुढे आपली फिलॉसॉफी सुरू होते. अशा प्रकारे या चारही प्रवृत्तीच्या लोकांना जर धर्म पाहिजे असेल तर तो आर्य धर्मच होऊ शकतो. या प्रवृत्तींविषयी पुढे महाराज सांगतात, यातील पहिल्या प्रवृत्तींना म्हणजे ज्यांना काहीही करावेसे वाटते त्या प्रवृत्ती सर्वांच्या त्रिगुणात्मक असतात. यातली पहिली म्हणजे १. कित्येकांना काहीच करावेसे वाटत नाही- त्यांच्यामध्ये तम जास्त, त्यांच्याकडून बुद्धीचे काम होऊ शकत नाही व परिस्थितीनुसारही जाऊ देणे चांगले नाही, म्हणून त्यांनी बुद्धिमान मनुष्यांच्या अनुरोधने वागावे व त्यांची सेवा करून व आपला तम नाहीसा करून हळूहळू सत्व वाढवावा। याच लोकांना शूद्र म्हंटले आहे. यांना खाण्यापिण्याचा नियम नसतो, हे मांस भक्षक असतात. मास अन्नाचा तमोभाग असल्यामुळे, मास खाणाऱ्यांना बुद्धी उत्पन्न होत नाही व मासांमध्ये मनाला आवडणारा पदार्थ नाही. अन्नामध्ये जो आवडी रूपाने भाग असतो, तो मनाला पुष्टी देतो तो भाग मासामध्ये नसतो, म्हणून मास खाणाऱ्यांना बुद्धी उत्पन्नच होत नाही. त्यांच्यातली इलेक्ट्रिसिटी ही तामसच असते. २.आता दुसऱ्या प्रकारचे लोक जे स्वार्थाकरिताच क्रिया करतात, ते सत्वतम मिश्रित असल्यामुळे सुखी दुःखी असतात व यांनाच वैश्य म्हणतात. ३. कित्येक लोक आपल्या तसेच दुसऱ्याचा फायदा पाहतात व तद्नुसार क्रिया करतात, ते सत्वरज मिश्र असतात, त्यांना क्षत्रिय म्हटले आहे. कित्येकांना परोपकारच करावासा वाटतो यांच्यात सत्व असते व हे ब्राह्मण म्हटले जातात. यांच्याकडून बुद्धीची कामे होतात. याव्यतिरीक्त, स्वभावाला जिंकून ज्याने त्रिगुणांवर सत्ता मिळवली असेल, असा सत्वनिष्ठ कोणीही असला तरी त्यांच्याशी व्यवहार करण्यास हरकत नाही. यस्य लक्षणम् प्रोक्तं...... ज्या स्वभावाचा जो असेल त्या वर्गात त्याला घालावे. स्वभावाचा जय करून जो कर्माने श्रेष्ठ असेल त्याला श्रेष्ठ समजावे, परंतु यासाठीच सत्व वाढवणे गरजेचे आहे व त्यासाठीच प्रत्येकाच्या स्वभावाला सोयीस्कर अशी वर्णाश्रम व्यवस्था आहे, ज्यात सर्वांनी प्रयत्न करून सत्ववृद्धि करून घेणे अपेक्षित आहे. ब्राह्मणाची कन्या दुसऱ्याला देऊ नये पण ब्राह्मणाने कोणाचीही स्त्री करावी, य सर्वांचा उद्देश सर्वांनी उंच चढावे कोणी खाली येण्याचा प्रयत्न करू नये याकरिता आहे. ही पूर्वीची रुढी होती आत्ताची रुढी उलट आहे. या पहिल्या प्रवृत्तीच्या म्हणजे काहीही करावे, या प्रवृत्तीच्या लोकांनी स्वभावाचा जय करावा म्हणून यांच्यामध्ये वर्णाश्रम योग्य आहे. या कर्मयोगातील प्रवृत्तीन्वरूपच, शास्त्राने वर्णाश्रम धर्म केले आहे व कर्मयोगातच वर्णाश्रम धर्म आहे. भक्तियोगात प्रेमच असल्यामुळे व प्रेम हा सत्वाचा धर्म असल्यामुळे यात कर्मयोगासारखे वैचित्र्य नाही व म्हणूनच जाती वगैरेचा प्रतिबंध नाही. ज्यांना आपल्या स्वभाव जिंकता येत नाही त्यांच्यातच स्वभाव जिंकून सत्व वाढवण्याकरिता उपाय पाहिजेत म्हणून कर्मयोगातच वर्णाश्रम धर्म आहेत पण ज्यांनी आपल्या स्वभाव जिंकला आहे, अशांचा सात्विक स्वभाव असल्यामुळे त्यांना कर्ममार्गाची जरुरी नाही. ज्यांना आपली शक्ती वाढवता येते त्यांनाच स्टॅंडर्ड कार्यकर्ते म्हणता येईल. जे वैद्य म्हणवतात, पण समजत काहीच नाही, त्यांच्यातच बरे वाईट असतात. पण जे चांगले शिकलेले आहेत, ज्यांना अनुभव आहे त्यांच्यात काही बरा वाईट भेद राहत नाही. कर्मयोगामध्ये जे वैशिष्ट्य दिसते ते स्वभावानुसार असल्यामुळे व त्याला नियमन जरूर असल्यामुळे वर्णाश्रम वगैरे आहे. राज योगातही मनाचा जय केल्यामुळे तेही सात्विक आहेत व म्हणून त्यांच्यातही वर्णाश्रम नाहीत. ज्ञान योगामध्ये जगाशी विरोध नसल्यामुळे व परमेश्वराशी ऐक्य होत असल्यामुळे व परमात्म्याचा कोणाशीच विरोध नसल्यामुळे, वर्णाश्रमाची काहीच जरूर नाही. या सर्व गोष्टींवरून असे सिद्ध झाले की सर्व प्रवृत्तीच्या मनुष्यांना या आर्य धर्मात प्रयत्नातून उन्नतीचा उपाय सांगितला आहे. म्हणून सर्वांना लागू पडणारा हा आर्य धर्मच होऊ शकतो. साधारणपणे जर इतिहासाचे निरीक्षण करून पाहिले तरी आर्य लोकच पूर्वी भरभराटीस होते व पुन्हा धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने जरी घेतले, तरी प्रत्येक धर्म हिंदू धर्मातून निघाला असे दिसते, तथापि आपल्याही पुराणात याला प्रमाण आहे. सर्वच धर्म आपल्याच धर्मापासून उत्पन्न झाले, असे प्रत्येक धर्मात लिहिले आहे तथापि आपल्या धर्मात जसा ऐतिहासिक पुरावा मिळतो, तसा कुठेच मिळत नाही. यातही आणखी विशेष गोष्ट अशी आहे की, आर्य धर्म सोडून बाकी सर्वच धर्मात तीन हजार वर्षांपूर्वी काही नव्हते, तथापि हे भूगर्भशास्त्र दृष्टीनेहे असंबद्ध आहे. अशा प्रकारचा उल्लेख आपल्या आर्य धर्मात नाही. भूगर्भ शास्त्राच्या दृष्टीने सृष्टीची मर्यादा ठरू शकत नाही. हिंदू धर्मात ही सृष्टी आकाश रूप आहे हे वगैरे सांगितले आहे, ते आधुनिक विज्ञानाला धरूनच आहे. अशा प्रकारे मनुष्य प्रवृत्ती नुसार चार योग व त्रिगुणा नुसार चातुर्वर्ण या सर्वांविषयी सखोल मार्गदर्शन संत श्री महाराजांनी सुकती रत्नावली, यष्टि १७- १८, सुबोध हिंदू धर्म या त्यांच्या ग्रंथात अत्यंत सुरेख रित्या केले आहे. त्यावरून आर्य धर्मच हा जगनमान्य धर्म आहे हे सहजरित्या समजते. धर्मा विषयी केलेले सखोल व उत्कृष्ट विचार बघून, “धर्माचा निर्विकार पद्धतीने विचार करणारा, शूद्र वर्णात सृष्टीमध्ये मीच एकटा आहे, असे तू पक्के समज.” या त्यांच्या वचनांवर आणखीनच विश्वास प्रबळ होतो. अशा श्रेष्ठ, व युक्तीने कायम पटवून देण्याचा बाणा असणाऱ्या ज्ञानेश्वरकन्येला जन्मदिनानिमित्त शतशः नमन। तुझिया प्रेमाचा ऐकला हल्लरु, म्हणूनि लेकरू लिहू जाणे।। (बाबाजी महाराज पंडित) 


लेखिका -
कु. राधिका शरदराव मोहोड 
७०५८९४९३३८