Wednesday, July 6, 2022

जन्मदिन विशेष



 संत श्री गुलाबराव महाराज जन्मदिन विशेष ...

(६ जुलै, १८८१, आषाढ शुद्ध दशमी) 

महाराजांचे भक्ती शास्त्रातील योगदान ...

स्वच्छंदोपात्त्तदेहाय विमलज्ञानमूर्तये, दासामानसहंसाय ज्ञानराजाय ते नम:।।

    संत श्री ज्ञानोबा रायांची भक्ती व प्रेम आपणा सर्वांनाच माहिती आहे, त्यांचे सर्व कार्य त्यांनी त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच निवृत्ती नाथांच्या चरणी अर्पण केले. त्यांच्याच प्रमाणे त्यांचे सर्व शिष्य-पराकोटीचा मोठेपणा असणारे व प्रसिद्धी परान्मुखच आहेत. 

  " सच्चिसुखविहाराय विमलज्ञानमूर्तये, श्री पांडुरंगनाथाय स्थितप्रज्ञायते नमा:।। "

माऊलींप्रमाणेच आपलं सर्व कार्य गुरूंना अर्पण करणारे म्हणजे श्री संत गुलाबराव महाराज (पांडुरंगनाथ महाराज) त्यांची गुरुभक्ती इतकी श्रेष्ठ होती की साक्षात माऊलींनी त्यांना 'स्व' नामाचा मंत्र दिला. महाराजांचे कार्य देखील माऊली प्रमाणेच अफाट आहे व माऊली प्रमाणेच महाराजांनी माऊलीर्पणमस्तु म्हणून गुरूंना सर्व कार्य अर्पण केले. त्यांनी कुठेही स्वतःचे नाव लावले नाही. या गुरू-शिष्य परंपरेतील अनेक गुरु शिष्य आपल्याला माहिती आहेत. सर्वांमध्ये प्रेम व भक्ती ती खरोखर आचरण्याजोगी आहे. जोपर्यंत भक्ती कायम आहे तोपर्यंत मार्गदर्शन करणारा गुरु आहे व आत्मज्ञानानंतर पावणारा निर्गुण परमात्माही आहेच. या सर्वांमध्ये भक्ती सर्वात महत्वाची. 

    भक्ती म्हणजे नेमकं काय? भज्- या धातूपासून भक्ती शब्दाची निर्मिती झाली. भज् म्हणजे भजने व त्याग असे दोन अर्थ. भजसेवायाम्- भगवंताला भजणे व संसाराचे बंधन तोडणे, येथे संसार सोडणे हा अर्थ नसून संसाराची आस, मोह, माया यांचा त्याग करणे असा आहे. समर्थ म्हणतात, सोडी संसाराची आस धरी भक्तीचा ध्यास ।। तुकाराम महाराज म्हणतात, " हेचि थोर भक्ती आवडते देवा संकल्पवि माया संसाराची ।।" संत श्री गुलाबराव महाराज म्हणतात ... “मस्तकी श्रीगुरू ह्रदयी गोविंद, तेणे ब्रह्मानंद ठायी ठायी । आत ब्रह्म रंग बाह्य सत्संग न करिता भंग संसारासी ।। “संसाराला विरोध कुठल्याही संतांनी सांगितलेला नाही उलट संसार चोखपणे पार पाडून परमार्थाची सांगड घातलेली दिसून येते. व ते करण्यासाठी भक्ती किती महत्त्वाची आहे हेच संतांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिले आहे. भक्तीचे महत्त्व सांगताना माऊली हरिपाठात म्हणतात, "भावेविणे भक्ति, भक्तीविन मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये," संत श्री गुलाबराव महाराज  देखील भक्तीचे महत्व सांगताना म्हणतात, ज्ञानप्राप्ति शिवाय मोक्ष मिळत नाही, पण केवळ गुरूवरील नितांत प्रेम आणि भक्ती यामुळे गुरु आपल्याला ज्ञानप्राप्ती करून देतात व मोक्ष देखील मिळवून देतात. म्हणूनच महाराज म्हणतात केवळ एका भक्तीने अथापासून इतिपर्यंत संपूर्ण परमार्थ हाती येतो. भक्तीची स्थापना नारद मुनी करतात व त्यांच्याच आज्ञेने भक्तीची स्थापना करण्याकरता माझा जन्म आहे असे श्री महाराज म्हणतात. 

    भक्ती म्हणजे काय यावर स्वामंतव्यांश सिद्धांत तुषार या त्यांच्या ग्रंथात श्रीमहाराज सांगतात, “सात्विस्मन्परमप्रेमरूपा ।। जितका आपण आपल्याला आवडतो, तितका परमेश्वर आवडला म्हणजे त्याला प्रेम म्हणावे, हे प्रेम करत असताना ईश्वरावाचून सर्व काही सोडावे.  भक्तीपदतिर्थामृताच्या पहिल्या अध्यायात महाराज म्हणतात, “जारिणिचे पर पुरुषी मन, की विरहिणी चा विरह गहन, तो विषय-भाव वेगळा करून, हरी रुपी प्रेम योजना ते भक्ती ।। प्रेम व भक्ती कशी असावी तर ती जारीणी प्रमाणे, विरहिणी प्रमाणे त्यातून केवळ विषय भाव तो वेगळा करून परमेश्वरावर  तितकेच नितांत प्रेम म्हणजे भक्ती.  ज्याप्रमाणे पाण्याची धार अखंड सुरू असते त्याप्रमाणे भगवंताविषयी अखंड प्रेमवृत्तीचा प्रवाह वाहणे याला भक्ती म्हणतात. भक्तीच्या साधन आणि साध्य अशा दोन बाजू आहेत. परमेश्वराचे निरंतर श्रवण कीर्तन करणे म्हणजे साधनात्मक बाजू होय. उपासक, उपाख्य, पूजाविधी, पूजाद्रव्य व मंत्रजप अशी पाच अंगे साधनरुपी भक्तीची आहे, आणि त्या भगवंताच्या ठिकाणी असलेल्या प्रेमजन्य आनंदाचा अनुभव म्हणजे साध्य. श्रीमहाराजांनी  सगुण भगवंताच्या निष्काम भक्तीचे गोविंदानंदसुधा व प्रीती नर्तन या ग्रंथात सोळा प्रकारची विवेचन केले आहे. पहिले आठ प्रकार गौण भक्तीचे म्हणजे साधनरूप आहेत, पुढील चार प्रकार मध्यमा भक्तीचे असून ते ज्ञानोत्तर भक्तीचा भाग आहे व शेवटचे चार प्रकार पराभक्तीचे आहे.  अशाप्रकारे गैोण, मध्यमा व परा असे मुख्य तीन प्रकार केले आहेत व त्याचे पुढे सोळा प्रकारात विभाजन केले आहे. प्रथम सच्चिदानंद आतील आनंदांशावर भक्तीची स्थिती नंतर १६ प्रकार व शेवटी तत्वमसि महावाक्यातून भक्तीचा उपदेश असे तीन भाग सूक्ष्म रीतीने उलगडून दाखवले आहे. 

    गौण भक्तीत नवविधाभक्तितील नववा प्रकार सोडून आठ प्रकार समाविष्ट केले आहे.; "श्रवणं किर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम् । अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्खं गोणियमष्टधा " १ ) परमेश्वराचे यश, गुण, महात्म्य श्रद्धापूर्वक ऐकणे श्रवण भक्ती. २ ) गेय पदांनी व अभंगांनी भावपूर्ण वातावरण तयार होते ती किर्तनभक्ती. ३ ) भगवंताच्या नामाचे व लिलांचे सदैव ध्यान करून मग्न राहणे म्हणजे स्मरण भक्ती. ४ ) देवाचे पूजन यांचा समावेश पादसेवन भक्ती व अर्चन भक्तीत होतो. ६ ) परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याच्या गुणांचे सतत ध्यान करणे म्हणजे वंदन भक्ती.७ ) परमेश्वराचा दास किंवा सेवक म्हणून केलेली सेवा म्हणजे दास्यभक्ती. ८ ) भक्त भगवंत हा पडदा बाजूला सारून समान पातळीवर केलेली सख्य भक्ती. केवळ एका स्मरणभक्तीत  योगाचे आठही प्रकार भक्ताला प्राप्त होतात. १. यम-नाम घेतले की इंद्रियांची विस्मृती होते, २. नियम-नामामुळे अंत्:करण शुद्धी होते जीव मात्रांच्या विषयी दया उत्पन्न होते हाच हरी भक्तांचा नियम, ३. आसन- स्मरण करताना कधीकधी देह स्तब्ध  होऊन जातो हीच भक्तांची आसन सिद्ध होय, ४. प्राणसंयमन- नाम घेताना कंठ सद्गद् होतो, श्वासही बंद होतो। ५. प्रत्याहार- नाम स्मरते वेळी मनाचे आकलन होते , धारणा - मन एकाग्र होउन प्रभूचरणी सि्थर, ध्यान - श्री हरीचा अंतकरणात अविर्भाव होतो. संप्रज्ञान समाधी - परमेश्वर स्मरणाने अंतर्बाह्य सर्वांचा विसर पडतो. उपासनेमुळे भगवान प्रसन्न होतो व भक्ताला समाधीचा अनुभव देऊन त्याला आत्मज्ञान संपन्नता देतो त्यानंतर होणाऱ्या व्युत्थान दशेत भक्त भगवंतावर स्वाभाविक प्रेम करू लागतो तिलाच ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात ही उपासना नव्हे. वर सांगितलेली गौण भक्ती म्हणजे उपासना  व त्या उपासने नंतर आत्मज्ञान होऊन परमेश्वरावर स्वाभाविकपणे होणारे प्रेम म्हणजे भक्ती अशा रीतीने उपासना व भक्ती यातील फरक महाराज समजून सांगतात. या दोन्ही भक्तीमध्ये अज्ञान पूर्वक व ज्ञान पूर्वक असाच तो केवळ भेद आहे, प्रेम मात्र दोन्ही ठिकाणे सारखेच असते. महाराज भक्तीपदतिर्थामृतात म्हणतात, गौणी आणि परा या भेदासी नाही थारा अवघी एकाकारा प्रेम लक्षणा ।। 

    आत्म निवेदनाने जीव ब्रह्माचे ऐक्य होत असल्यामुळे म्हणजेच तो व मी वेगळा नाही अशी ज्ञानप्राप्ती होते. महाराजांनी सांगितलेला आत्मनिवेदन रूप दुसरा मुख्य प्रकार म्हणजे मध्यमा म्हणजेच ज्ञानोत्तर भक्ती , याचे आत्मसमर्पण, असमर्थता, अहंतासमर्पण, लालन व वात्सल्य असे प्रकार आहे. गौण भक्तीतील उपासनेमुळे मी उपासना करणार हा अहंकार  होऊ नये म्हणून भगवंताच्या चरणी आत्मनिवेदन करणे. यासाठी अहंता व ममता असे दोन समर्पण महत्त्वाचे आहे असे महाराज सांगतात १. ममता समर्पण- माझे असलेले व मला पाहिजे असलेले सर्व भगवंताला अर्पण केले की ममता समर्पण झाले. पुत्र, मित्र, कलत्र, गोत्र, वित्त, घरदार माझा सर्व परिवार माझा नसून भगवंताचा आहे असे निवेदन करून मम प्रत्ययापासून स्वतःची सुटका करून घेणे म्हणजेच ममता समर्पण. बळीराजाने आपले सर्वस्व भगवंताला अर्पण केले त्यावेळी बळीराजाचे ममता असलेले सर्व पदार्थ भगवंताने हरण केले हे अर्धे आत्मनिवेदन झाले. २. अहंता समर्पण - आपण या देहाला मी समजतो त्यामुळे अहंता समर्पण महत्त्वाचे आहे. देह आणि सर्व इंद्रिये भगवंताची आहेत असे समजून त्यांचा उपयोग भगवंता साठीच केला पाहिजे. देहापासून बुद्धी अहंकार, सर्व पदार्थ अर्पण झाले की शेवटी मी नसून भगवानच आहे असा अनुभव येतो व हेच पूर्ण अहंतेचे समर्पण होय. हनुमानाने द्रोणाचल पर्वताचे शिखर आपल्या हातावर उचलून आणले पण शेवटी त्यांना वाटले या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारणारा मी द्रोनाचल कसा उचलू शकणार, भगवान रामाने तो आपल्या सामर्थ्याने आणला हेच अहंता समर्पण होय. बळीराजांनी देखील शेवटी परमेश्वराचं पाऊल आपल्या डोक्यावर ठेवून संपूर्ण अहंता समर्पण केले. 

    भगवंत चरणी अहंता ममता दोन्हींचे आत्मनिवेदन झाले की, अद्वैताची भावना दृढ होते या भावनेतून व्युत्थान म्हणजे जागृत होताना  परत जी अहंवृत्ती स्फुरण पावते ती म्हणजे ज्ञानज आणि प्रेमज.  ज्ञानज वृत्तीत जाणिवेचा अंश असतो जो आनंददेणारा नसतो व प्रेमज हा प्रेमाचा म्हणजे आनंदाचा अंश प्रधान असतो. भक्त प्रेमज वृत्तीचा म्हणजे भक्तीचा आश्रय घेतात अशा आनंदाचे प्राधान्य असलेल्या भक्तीचे तीन प्रकार आहेत तसैवाहम्-मामैवसो व स एवाहम् । तस्येवाहम्-मी त्याची आहे-लालन भक्ती व मामैवसो-माझा भगवंत आहे- पालन भक्ती, मामैवहम्- माधुर्य भक्ती। उपासनेमुळे संसार रुपी अहंकार जरी नाहीसा झाला तरी ज्ञान अहंकार अस्तित्वात आहे ही कल्पना करून भक्त परत रडू लागतो. ‘मी ज्ञानी आहे’ ( ज्ञानज ) असा ज्ञान अभिमान न उठता मी गुरुपुत्र आहे अशी सुखद प्रेम वृत्ती उठणे म्हणजे प्रेमज. या प्रेमातूनच लालन भक्ती निर्माण होते, तस्यैवाहम् -  मी भगवंताचा आहे असे म्हणण्यात स्वतःकडे लहानपण येते व मोठेपणा भगवंताकडे जाते. ज्ञानी अहंता रुपी संकटातून वाचवण्यासाठी भगवंताला पिता म्हणून हाक मारतो. महाराजांनी प्रीतीनर्तनातील लालनाभिनयात हे सर्व भाव रसाळ रीतीने शब्दांकित केले आहे ते शब्दांकन पाहताना ही लालन भक्ती लक्षात येते. भक्त प्रल्हादाचे रक्षण त्याच्या लालन भक्ती मुळेच भगवंताने नरसिंहावतार घेऊन केले. मामैवासौ-मम एव असौ म्हणजे माझा भगवान आहे हिची पूर्णतः म्हणजेच वात्सल्य भक्ती. यामध्ये आत्तापर्यंत भगवंतांनी पुत्र समजून आपल्यासाठी जे काही कष्ट घेतले त्याची जाणीव होऊन अंत:करण पिळवटून निघते, यापुढे मात्र भगवंताला कष्ट होऊ नये म्हणून भक्त भगवंताला आपले बाळ समजतो आणि स्वतःकडे आईपण घेतो त्याच्या मनात येते किमी रडून-रडून माझ्या श्रीहरीला फार कष्ट दिले आणि स्वतः मात्र त्याची काहीच सेवा केली नाही  म्हणून त्याची सर्व प्रकारे सेवा करतो. भगवान व भक्त यामध्ये भेद नाही पण भगवान सुखी व्हावा असे भक्ताच्या कोमल चित्ताला वाटते म्हणून तो नित्यनिर्मलास स्नान घालतो, नित्यतृप्त अशा भगवंताला भोजन करवतो. आणि  सर्वव्यापक असलेल्याला कडेवर घेतो. अशा वात्सल्य प्रेमाने काम क्रोध लोभ या विकारांसह येणारे वाचाऋण नाहीसे होते, तरीसुद्धा भक्ताचे काही विकार भगवंताला अर्पण करायची राहूनच जातात म्हणून शेवटी माधुर्य प्रेम करून वाचाऋण  नाहीसे करायचे असते. प्रेमज ‘स एवाहम्' लालन आणि वात्सल्य या प्रेमाची पूर्णता झाली की भक्ताचा बराचसा अभिमान कमी झालेला असतो. अशावेळी स एवाहम या  समानाधिकारणाने एका पातळीवर येऊन भक्त भगवंतावर प्रेम करतो याला माधुर्याची जोड दिली कि ती माधुर्य भक्ती होते. यामध्ये  कोणतीही वृत्ती असो कोणताही विकार असो तो भगवंताला आलंबन होऊनच उठतो व सगुण भगवंतालाच अर्पण होतो. महाराजांनी माधुर्य प्रेमाची उपपत्ती सांगताना श्री शांडिल्यमुनी, श्री नारद व मधुसूदन सरस्वती यांचा समन्वय केला आहे. मधुरा भक्ती म्हणजे काय तर अंतर्बाह्य सर्वत्र भगवंताचा वियोग अनुभवायला येणे म्हणजे मधुरा भक्ती होईल. मधुरा भक्ती म्हणजे कांत कांता भाव। जसे पत्नी  पति वर जिवापाड प्रेम करते, माझ्या नवऱ्याला काही त्रास नको जे होईल ते मला होऊ दे हा जो प्रेमभाव आहे, तो परमेश्वरावर जडला म्हणजे ती मधुरा भक्ती. आपण देवाची आरती ओवाळतो हादेखील एक मधुर भावच आहे माझ्या सुंदर परमेश्वराला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती सर्व मी ओवाळून स्वता:वर घेते हा त्यामागचा मधुर भाव म्हणजे मधुरा भक्ती! श्रीनारद म्हणतात अनिर्वाच्य प्रेम म्हणजे भक्ती ज्याचे वर्णन आपण करू शकत नाही त्याचा केवळ आत्माअनुभव घेता येतो. शांडिल्य मुनी नुसार वियोगोपलालन म्हणजे प्रेम। यांचा समन्वय करताना श्रीमहाराज म्हणतात, अंतकरणात अनिर्वाच्य प्रेम असल्यावर परमात्मा आणि आणि मी एकच आहे हे दिसून येते परंतु तरीदेखील परमेश्वराचे सगुण रूप बघण्यासाठी जी वृत्ती उत्पन्न होते त्यामुळे  परमेश्वर आणि आपण एक असलो तरी त्या संयोगातही वियोग अनुभवण्यास मिळतो. महाराज म्हणतात व्यवहारात जसा विषयांचा संयोग झाला की तृप्ती होते ती तृप्ती भगवंताशी झालेल्या संयोगानंतर यावयास नको म्हणून विरोगातील उत्कट्टता कायम ठेवण्यासाठी अंत:करणात संयोगात देखील वियोग उत्कट असते. हे संयोगी वियोगोपलालन समजून घेण्याकरता ब्रज गोपिकानाम असे मधुरा भक्तीचे जे लक्षण श्री नारदमुनी सांगतात ती  गोपींची उत्कटता श्रीमहाराजांनी फार सुंदर असा शब्दात वर्णिली आहे. गोपिकांच्या परम प्रेमामुळे त्यांच्या सर्व वृत्ती भगवंताकडे व व्यापक ब्रह्मचित्तात भरले जाते, पाठी पोटी,आत बाहेर सर्वत्र एका व्यापक ब्रह्माचाच अनुभव येतो. परंतु अशावेळी श्रीकृष्णाच्या सगुण रूपाचा वियोग त्यांना जाणवतो व प्राणसखा परत दूर जाइल या विचाराने त्या व्याकुळ होतात. श्रीकृष्णाचे सगुण रूप पाहण्याकरता बाहेर बघतात ते परत हृदयातील श्रीकृष्ण दूर जाणार नाही ना म्हणून परत वियोग होतो, परमेश्वराचा विरहाने हृदय व्याकूळ होऊन निर्गृणात मिळून गेले तर परत सगुण श्रीकृष्णाला आलिंगण देता येणार नाही, अशाप्रकारे गोपी संयोग झाल्यानंतर हे भगवान मला पुन्हा सोडुन तर जाणार नाही असे भय चित्तात सतत बाळगते हीच संयोगातील वियोग वृत्ती आहे. सत्, चित्, आनंद यातील आनंदाचा अंश या माधुर्य भक्तीनेच मिळतो आणि सत् व चित् हे दुय्यम ठरतात. 

    महाराज पंचलतीका गोपी होते असे ते स्वामंतव्यांश सिद्धांत तुषार या ग्रंथात सांगतात, म्हणूनच त्यांना मधुरा भक्तीचा अधिकार होता आणि म्हणूनच त्यांनी मधुराव्दैत संप्रदायाची स्थापना केली. या मधुरा भक्तीची आद्यप्रवर्तक म्हणजे श्री राधा.  अंतर्बाह्य भगवंताचा संयोग असूनही गोपींच्या प्रेमाचे समाधान होत नाही तिच्या प्रेमाचा प्रवाह खंडित न होता सतत सगुण भगवंताकडे वाहत राहतो,हीच ज्ञानेश्र्वरकन्येची- गोपी पंचलतिकेची- संयोगेपि वियोगोपलालन माधुर्यभक्ती होय. अशा प्रकारे महाराजांनी भक्तीचे सोहळा प्रकार केले आहेत ते सर्व क्रमाक्रमाने श्रेष्ठ आहेतच परंतु अद्वैत ज्ञानानंतर संयोगेपि वियोगोपलालन प्रेम उत्पन्न झाले की मग तेच असीम प्रेम नाना भावांनी उचंबळून येते. ज्ञानप्राप्ती नंतर परमेश्वराच्या अद्वैत रूपाची जाणीव होते, परंतु प्रेमासाठी, भक्तीसाठी परत त्याचे सगुण रूप पाहावेसे वाटते, यालाच शंकराचार्यांनी आहार्यव्दैत म्हंटले आहे, आहार्यव्दैत म्हणजे मुद्दाम करून घेतलेले व्दैत, याने अव्दैताची भावना नाहीशी होत नाही, परंतु सर्व काही परमेश्वर अशा ज्ञानाने मात्र अहंकार होऊ नये व आपणच ब्रम्ह तर मग पूजा कुणाची करायची, ऐसा सांडूनी सोहळा कोण लाऊनी बैसे डोळा।। परमेश्वराचा प्रेमासाठी केलेली ही व्दैत भावना भक्ताच्या प्रेमासाठी आहे याने अव्दैत ज्ञान नाहीसे होत नाही, हे समजून सांगताना महाराज अतिशय सोप उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आपण सोन्याचे दागिने करतो कारण ते नक्षीदार व सुंदर दिसतात पण अशानी सोन मात्र नाहीस होत नाही, केवळ सोन्याच रूप बदलत मूळ बदलत नाही त्याचप्रमाणे व्दैत भावनेने अव्दैताची भावना जात नाही, तर ती आणखीन दृढ होते. यालाच श्री संत गुलाबराव महाराज ‘अनध्यस्तविवर्त’’ म्हणतात. हे त्याचे भक्ती शास्त्रातील नवे योगदान आहे. भक्तर्थ्यं कृतम् व्दैतम्, अव्दैतातअतिरूच्यते।।। भक्तीसाठी केलेली अव्दैतातील द्वैत भावना आवडणारी आहे. 

    साधारण मनुष्याला  ज्ञानोत्तर भक्ती मिळवण्यासाठी प्रथम सगुणभक्ति महत्त्वाची आहे व आपण रोज जी कर्म करतो ती सर्व भगवंताला अर्पण करावे म्हणजे अहंभावना नाहिशी होते व ज्ञान प्राप्ती नंतर देखील ज्ञानाचा अहंकार होऊ नये म्हणून भक्तीची व्याकुळता कायम रहावी. अशाप्रकारे ज्ञान व कर्म या दोघांनाही भक्तीची सांगड घालून कर्म -भक्ती -ज्ञान यांचा समन्वय श्रीमहाराज करतात. महाराजांनी ही माधुर्य भक्ती करून श्रीकृष्ण पत्नीचे स्थान मिळवले, व केवळ ३४वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण विश्वाला दीपावून टाकणारे अफाट कार्य केले. असा एकही विषय नाही ज्याचा सामावेश श्री महाराजांच्या ग्रंथामध्ये नाही. अशा जगद्गुरूंचा आज तिथीने जन्मदिवस, या युगाचार्यांचे व्यापक व मौलिक विचार याकडे युवापिढीची आवड निर्माण व्हावी कारण विज्ञान, इतिहास, संगीत, काव्य, नाट्य, नवीन नावंग लिपी, आयुर्वेद, सांख्य, शास्त्र, योग, धर्माचा समन्वय, नीतिशास्त्र, बुवाबाजी आणि बरच काही ज्यासाठी एक आयुष्य देखील अपुर्ण आहे इतका व्यापक ज्ञान भांडार श्री महाराजांनी निर्माण केला. या श्रेष्ठ ज्ञानेश्वर कन्येला शतशः नमन!!! 

तुझिया प्रेमाचा ऐकला हल्लरू म्हणुनी लेकरू लिहू जाणे।।     (स्कंददास महाराज)   

संदर्भ,  - प्रितीनर्तन, भक्तीपदतीर्थामृत, स्वामंतव्यांश सिद्धांत तुषार 

 लेखिका

कु. राधिका शरदराव मोहोड

७०५८९४९३३८


x

Tuesday, July 5, 2022

जन्मोत्सव कार्यक्रम पत्रिका २०२२

श्री संत गुलाबराव महाराज  ऊर्फ पांडुरंगनाथ महाराज

जन्मोत्सव

श्री क्षेत्र माधान 

कार्यक्रम पत्रिका