Monday, July 19, 2021

आरती व गुलाब सौरभ

 आरती व गुलाब सौरभ

रचनाकार - स्वामी गोविंददेव गिरी (श्री किशोरजी व्यास)






जन्मदिन विशेष - ( आषाढ शुद्ध १०)

||श्री ज्ञानेश्वर माऊली समर्थ||





संत श्री गुलाबराव महाराज जन्मदिन विशेष

                                        तुझा पाणी स्पर्श ज्ञानियांचा हर्ष, प्रेमाचा निष्कर्ष तूची दिला |

                                                                                    -- बाबाजी महाराज पंडित

 

        स्व भक्तीने व ज्ञानाने संपूर्ण ब्रह्मांडाला दिपवून टाकणारे, ज्यांच्या दूरदृष्टी व कार्यापुढे कितीदाही नतमस्तक झालो तरी जोपर्यंत त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन आपण आचरणात आणत नाही तो पर्यंत सर्वच निरर्थक, अगदी अल्पशा आयुष्यात संपूर्ण ब्रह्मांडाला ज्ञानाची दृष्टी देणारी अशी आपल्याला लाभलेली संत मंडळी।
त्यातीलच एक श्रेष्ठ उदाहरण म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर माऊली,  केवळ 21 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगापुढे ज्ञानाचा जो भांडार खुला करून दिला तो अमूल्य आहे, ज्ञानेश्वरीतील संदर्भ हे आपल्या सर्वसामान्यांसाठी जणू अमृताचा साठाच। अथपासून इतिपर्यंत च ज्ञान चोख उदाहरणांसहित ज्ञानेश्वरीतून शिकायला मिळतं. ज्ञानेन दिव्यते ज्ञानदेवा:। सर्व प्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या माऊलींच्या ठिकाणी असलेली उदारता व पराकोटीची गुरुनिष्ठा खरोखर एक आदर्श आहे, हाच त्यांचा आदर्श, गुरु-शिष्य परंपरा व पराकोटीची प्रसिद्धी-परान्मुखता माऊलींच्या इतर भक्तां सोबतच तंतोतंत आपल्या आयुष्यातून,कार्यातून व आचरणातून पटवून देणारी त्यांना शोभून दिसणारी ज्ञानेशांची कन्या म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज।
६ जुलै १८८१ आषाढ शुद्ध दशमी हा दिवस मोहोड घराण्यासाठी सुवर्ण क्षण ठरला, सौ अलोका बाई गोंदूजी मोहोड, यांच्या पोटी महाराजांनी लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी जन्म घेतला, त्यांचे मूळ गाव माधान। महाराजांना केवळ नऊ महिन्यांचे असताना चुकीच्या उपचारांमुळे डोळे गमवावे लागले, परंतु गुरु प्रेम व प्रयत्नांची पराकाष्ठा यापुढे काही एक अशक्य नाही याचे उदाहरण म्हणजे श्रीमहाराज, प्रयत्न व गुरूभक्ती किती श्रेष्ठ व दैववादावर ते कसे विजय मिळू शकतात हे त्यांनी केवळ लिहून ठेवले नाही तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात प्रयत्न व गुरूभक्ती यांच्या बळावर साक्षात आपल्यासारख्या डोळसालाही लाजवेल असे कार्य त्यांनी करून दाखवले, “गुरु हा साधकाची साह्य” याचे तंतोतंत उदाहरण महाराजांच्या आयुष्यातून व विचारातून प्रत्यक्ष अनुभवायास मिळते, त्यांची भक्ती त्यांचा विश्वास व ग्रंथांविषयी प्रेम व ते वाचून घेण्याची तळमळ, सर्व शास्त्रांचा आधार घेऊन चुकीचं ते खोडून बरोबर ते आपल्यापर्यंत पोचवण्याचे त्यांचे प्रयत्न व तळमळ त्यांच्या साहित्य अलंकारात दिसून येते. त्यांची ही भक्ती व विश्वास पाहूनच संपूर्ण जगताच्या माऊलीने त्यांना मांडीवर घेऊन स्व नामाचा मंत्र दिला, या गुरुशिष्यांची भेटीची साक्ष म्हणजे समाधीनंतर माऊली कशी दिसते याचे पहिले चित्र महाराजांनी एका चित्रकारा कडून काढून जगासमोर आणले.
 केवळ चौतीस वर्षांच्या आयुष्यात 130 ग्रंथनिर्मिती, ज्यात माऊलींप्रमाणेच एकही विषय निसटलेला नाही, यात सर्व धर्मांचा समन्वय ,योग, सांख्य, न्याय, विज्ञान, भक्ती, शिक्षण, संगीत ,काव्य, नवीन नावांग भाषेची निर्मिती, क्रीडा, मनोविज्ञान, बुवाबाजी, इतिहास, पाश्चात्त्य मतांची समीक्षा, नीतिशास्त्र या सर्वांचा समावेश आहे.  चक्षू तील तेज नाहीसे झाले तरी त्याची जागा प्रज्ञाचक्षूंनी घ्यावी यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नरत होते, महाराजांच्या 130 ग्रंथसपदेपैकी प्रत्येक ग्रंथातील एक विषय देखील एका लेखात पूर्ण होणे शक्य नाही अशी ग्रंथसंपदा त्यांनी 34 वर्षात पूर्ण केली.
              आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही प्रगती केली असली तरी, धर्म व नीतिमत्ता सोडून आपण वागू शकत नाही. धर्माच्या काही चुकीच्या संकल्पनांना आपण अजूनही घट्ट पकडून ठेवलंय, परंतु खऱ्या अर्थाने धर्म समन्वय समजण्याकरिता आपल्याला संत साहित्याकडेच वळावे लागते, त्यातच आपल्याला आजचे प्रगत विज्ञान व जगण्यासाठी आवश्यक ते तत्वज्ञान या दोघांची सांगड घातलेली दिसते. अंधश्रद्धा, चमत्कार या सर्वांवर मात करत प्रयत्नवाद व निष्काम भक्ती यालाच सर्व संतांनी प्रथम स्थान दिले आहे केवळ संतच असं जगू शकतात हा विचारच चुकीचा, संत श्री गुलाबराव महाराज यावर अत्यंत सुंदर उत्तर देतात परमेश्वर तुमच्या हृदयात प्रवेश करून तुम्हाला अवतार बनवणार नाही असा काही त्याने तुमच्याजवळ पट्टा लिहून दिला आहे का? तुम्ही आपली शुभ्र वृत्ती दाबू नका तो परमात्मा कदाचित तुमच्याच ह्रदयात अवतार घेईल. सत्व वृद्धि हाच खरा धर्म हे महाराजांनी गीतेचा आधार घेऊन पटवून दिले आहे. स्वधर्माचे पालन याला महाराजांनी अत्यंत महत्व दिले आहे ते का यासाठी  यावरील शंकराचार्यांचे गीतेवरील भाष्य महाराज सांगतात, प्रत्येकाचा धर्म निराळे कारण स्वभाव निराळे, परमेश्वराने स्वभावाप्रमाणे कर्म करायला सांगितले शास्त्राप्रमाणे नाही कारण ज्याप्रमाणे आई मोठे होईपर्यंत मुलाला लाडाने वाढवते परंतु नंतर तो त्याच्या स्वभावावरच जातो त्यामुळे स्वभाव बदलून कर्म सांगण्याची शास्त्राची प्रवृत्ती नाही. जन्मावरून जाती ठरवल्यास कोणत्याच जातीत काही च भेद नाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व आपल्या आपल्या आईच्या गर्भातून उत्पन्न होतात सर्व अन्न खातात,कर्मा वरून जाती ठरवल्यास, सोने मातीत सापडो अथवा सोन्याच्या खाणीत ते सोनेच राहते, त्या प्रमाणे कोणत्याही जातीचा चांगल्या गुणांचा मनुष्य सापडला तर तो श्रेष्ठ समजावा असे आचार्य म्हणतात. शूद्र जर चांगल्या गुणांचा असला तर तोही चांगला गुणवान ब्राह्मण होतो व ब्राम्हण वाईट कर्म करेल तर तो शूद्र होतो. धर्मराजाला वैशंपायन सांगतात, “हे राजा ज्याने आपली पाच इंद्रिय जिंकली आहेत व मनाचा निग्रह केला आहे त्याला दान द्यावे, परंतु हे जन्म वादी लोकांना मान्य नसेल तर त्यांना श्रीमहाराज विचारतात “जर तुमचा पुत्र वाईट गुणांचा असला व नोकर विश्वासू गुणांचा असला तर एखादे वेळी काशीस जाण्याचे असल्यास तुम्ही घराचा कारभार कोणाकडे सोपवाल?” अर्थातच नोकरावर । परमेश्वरालाही चांगले गुण आवडतात त्यामुळे आपले ज्ञान भांडार तो चांगल्या लोकांचा हाती देतो. यावर जन्म वादी म्हणतात जाती जन्मानेच उत्पन्न होते, गुणधर्माने नाही ज्याप्रमाणे सर्वे झाड बीजाने निराळे होतात, यावर परत गुणधर्म वादी म्हणतील झाडांच्या बीजा प्रमाणे मनुष्याची बीज निराळे नाही,  तर सर्व जगाचे कारण मायाच आहे, पुन्हा जन्म वादी म्हणतात की जर मायाच कारण आहे तर मग मनुष्य, बैल ,घोडा, कुत्रा वगैरे निराळे का व्हावे याप्रमाणे हा वाद अनादी सिद्ध आहे अजून यावर निर्णय झाला नाही, त्यामुळे महाराज म्हणतात, स्वभाव कसाही बनला असो मनाने असो वा शिक्षणाने असो स्वधर्मा प्रमाणे वागणेच प्रत्येकाला हितावह आहे. जन्म वाद व गुणधर्म वाद यात न पडणेच योग्य.
   आता प्रत्येकाला स्वधर्म सांगताना महाराज म्हणतात, मुलाने पित्याची आज्ञा पाळावी हा त्याचा धर्म आहे, स्त्रियाना पतीची सेवा करण्याचा धर्म आहे, विविध कर्मानुसार आचरण करणे, बाहेर स्थान करून व आत शांती ठेवून शुद्ध राहणे, क्षमा असणे, सरळ पणाने वागणे, निष्कपट मनाने वागणे,यज्ञाची पात्रे कशी मांडावी हे समजणे, ईश्वराच्या ठिकाणी श्रद्धा असणे हा ब्राह्मणाचा स्वाभाविक धर्म आहे. अंगी शूरपणा असणे, शत्रूला रागावून न मारणे, अंत:करण शांत असणे, दुसऱ्याचे वाईट करणार नाही, धैर्य असणे, युद्धातून पळून न जाणे क्षत्रियांचे स्वभावीक कर्म आहे. शेती करणे, व्यापार करणे हे वैशांचे स्वाभाविक धर्म आहे, वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हा शूद्रांचा स्वाभाविक धर्म आहे. आपला धर्म जो मनुष्य चांगल्या रीतीने करतो त्यालाच चित्तशुद्धी प्राप्त होते. (गीता)
                    असंतोषी ब्राह्मण कामाचा नाही, संतोषी राजा कामाचा नाही वैशा सलज्ज असून उपयोगी नाही व कुलांगना निर्लज्ज असू नये, अर्थातच ज्याचा जो धर्म तोच त्याने करावा व तो धर्म परमेश्वराला अर्पण करावा. भगवान म्हणतात पार्था जे तू करतोस, जे काही खातोस, जे काही होम करतोस, जे काही दुसऱ्यांना देतो ते सर्वच मला अर्पण करीत जा , जसे पतीनेच सर्व आणले आहे यात माझे काही नाही असे समजून पतिव्रता पतीची सेवा करते, त्याप्रमाणे सर्वच परमेश्वराचे आहे यात माझे काहीच नाही असे भक्तांनाही वाटते. कारण परमेश्वराने आपल्याला धर्म सांगितला तो आचरण करण्याकरता आपल्याला नाक, डोळे, कान, हात, पाय दिलेत तर त्या हाता- पायाच्या योगाने केलेला धर्म आपण ईश्वराला अर्पण केला नाही, तर तो धर्म होईल काय? म्हणून सर्व ईश्वराला अर्पण करावे यानेच चित्तशुद्धी होते. ज्याप्रमाणे लहान मुलाला आई कडेवर उचलून घेते व त्याचे संगोपन करते त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेले कर्म करून ईश्वरार्पण केली असता परमेश्वरच आपल्याला उचलून घेतो. या जगात जसे ज्याचे कर्म असेल तसे त्याला फळ मिळते हा कर्माचा नियम अबाधित आहे. व हा घेतल्याशिवाय धर्माला धर्मत्वच येत नाही. भगवंताने सांगितलेला धर्म कर्मधर्म  किंवा जाती धर्म नसला पाहिजे. भगवान म्हणतात, अभय ,सत्व शुद्धी, ज्ञान प्राप्त करून देणारी साधने, दान, यज्ञ, अहिंसा, सत्य, अक्रोध,त्याग, शांती, दया इत्यादी गुण प्राप्त केल्याने जगात्- कारणाकडे सुलभ जाता येते म्हणून हाच धर्म भगवंताने सांगितला असावा व या धर्माचे ठिकाणी सर्वांना अधिकार आहे. महाराज म्हणतात, “जगत्कारणाकडे नेणारा तो धर्म।“
        हाच धर्म युगायुगात स्थापन झाला पाहिजे कारण दुष्टांचे शासन करून साधूंचे रक्षण करण्याकरिता, सत्वगुणाचे परमेश्वर स्थापना करतो

कूर्म- पृथ्वी रसातळात जायला निघाली तेव्हा तिचा उद्धार केला. . वराह- हिरण्यास मारलं. .नुर्सिंह- हिरण्य कश्यपूला मारून प्रल्हादाचे रक्षण केले, जाती धर्मा कडे लक्ष दिले नाही ४. वामन- देवांचे रक्षण करून बळीला पाताळा चे राज्य दिले, पुढे पुन्हा इंद्रपद देणार आहेत, यावरून कर्माचा नाश केला नाही .बळीच्या आश्रयाने असुर फार माजतील, एवढा करिता पराजय केला. .परशुराम- क्षत्रियांना मारले, चितेतून ब्राह्मणांना जिवंत केले, यावरून जाती धर्म स्थापन केला नाही. .राम- रावणाचा संहार केला, सत्य दया अशा धर्मांचे स्थापन केले भक्त मालेत शबरीचे तीर्थ तळ्यात टाकून ब्राह्मणांना घ्यावयाला लावले अशी कथा आहे, यावरून जाती-धर्म स्थापन केला नाही असे सिद्ध होते. .कृष्ण गवळ्याच्या घरी जन्म घेऊन यज्ञ पाल्यांचे अन्न घेतले, गोपी पतींची पर्वा न करता कृष्णा ला शरण आल्या तेव्हा धर्माची आडकाठी न घालता त्यांना पावन केले. .बुद्ध-अहिंसा धर्म स्थापिला, जाती धर्म स्थापन केला नाही कारण ज्ञानकांड चा निषेध केला नाही. १०.कल्की- भविष्यपुराणांत मध्ये म्लेच्छांप्रमाणे  वागतील त्यांचा नाश केला जाईल असे म्हटले आहे या सर्वांवरून महाराजांनी सत्व वृद्धि म्हणजेच खरा धर्म हे पटवून दिले.

“धर्माचा निर्विकारपणे विचार करणारा शूद्र वर्णात सृष्टीत मी एकच असे पक्के समज” या महाराजांच्या वाक्यावर विश्वास बसतो .महाराज म्हणतात, “परिस्थितीने बले करून मला अधर्मात ओढून नेले, तरी मी तोंडाने धर्म सुचवून मरेल हा माझा निश्चय आहे” अशा या श्रेष्ठ जगद्गुरुना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शतशः प्रणाम।
         तुझिया प्रेमाने किती मी उदंड, म्हणुनी प्रबंध तुझा पायी।।

 

                                                                                                             लेखीका

                                                                                                कु. राधिका शरदराव मोहोड

                                                                                                                        ७९७२८६३८२२